थकीत बिलासाठी थेट सबस्टेशनवरूनच वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:18+5:302021-03-22T04:21:18+5:30
बार्शी तालुक्यात शेतकऱ्यांकडे शेतीपंपाची सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वीज बिलाची बाकी थकीत आहे. सध्या शासनाने कृषी संजीवनी योजना सुरू ...
बार्शी तालुक्यात शेतकऱ्यांकडे शेतीपंपाची सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वीज बिलाची बाकी थकीत आहे. सध्या शासनाने कृषी संजीवनी योजना सुरू केलेली आहे. त्याला देखील पाहिजे तसा प्रतिसाद नाही. त्यामुळे आता शेवटचा मार्ग म्हणून थेट सबस्टेशनवरून वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात हातातोंडाशी आलेली पिके करपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यात महावितरण थोडीशी दया दाखवत एक दिवसाआड जनावरांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी एक तास वीजपुरवठा सुरू करते.
तसेच ज्या शेतकऱ्यांकडे थकीत बिल आहे. अशा शेतकऱ्यांनी प्रति एचपी ३ हजार रुपये बिल भरावे तरच त्या गावाची वीज पूर्ववत जोडली जाईल, अशी भूमिका घेतली आहे.
या निर्णयामुळे ज्यांची बिले थकीत नाहीत. कोणतीही थकबाकी नाही, अशा शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे ज्यांचे बिल थकीत आहे, अशाच शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करावे, असे सरसकट कनेक्शन तोडणे बरोबर नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे आता महावितरणच्या अन्यायी भूमिकेच्या विरोधात शेतकरी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट ::::::::::::
ऐन उन्हाळ्यात महावितरणने सुरू केलेली वीज कट करण्याची मोहीम अतिशय चुकीची आहे. असे न करता ज्याचे बिल थकले आहे, अशा शेतकऱ्यांचे बिल कट करावे. काही लोकांच्या थकबाकीसाठी सरसकट बीज बंद करणे बरोबर नाही. हे बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
- शंकर गायकवाड,
राज्य उपाध्यक्ष, शेतकरी संघटना