सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख थकबाकीदार वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित होणार
By Appasaheb.patil | Published: March 1, 2022 04:56 PM2022-03-01T16:56:08+5:302022-03-01T16:56:20+5:30
महावितरणचा इशारा; ऐन उन्हाळ्यात बसा उकाड्यात...
सोलापूर : जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे तसेच सार्वजनिक सेवा व इतर सर्व वर्गवारीतील ५ लाख ७५ हजार ४६८ ग्राहकांच्या वीज बिलांची थकबाकी सद्यस्थितीत ४२१३ कोटी ६८ लाख रुपयांवर गेली आहे. थकीत बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केेले आहे.
वाढत्या उन्हामुळे सर्वच वर्गवारीमध्ये वाढत्या वापराने विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न महावितरणसमोर निर्माण होत असल्याने थकबाकी वसुलीला वेग देण्यात आला आहे.
---------
अशी आहे थकबाकी...
वर्गवारी - ग्राहक - थकबाकी
- - घरगुती - १ लाख ७९ हजार ४४६ - ३६ कोटी ५१ लाख
- - वाणिज्यिक - १६ हजार ८१८ - ६ कोटी ३९ लाख
- - औद्योगिक - ३ हजार ८८ - २ कोटी ८६ लाख रुपये
- - कृषी - ३ लाख ६८ हजार १७३ - ३५९९ कोटी २ लाख
- पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे ५६६ कोटी व सार्वजनिक सेवा वर्गवारीसह सर्व ग्राहकांकडे एकूण ४२१३ कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
--------
कृषीपंप थकबाकीमुक्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत...
कृषी ग्राहकांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत ३५९९ कोटी २ लाखांपैकी ५० टक्के थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना उर्वरित थकबाकी माफ करण्यात येत आहे. शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
-------------
भरणा करा....कारवाई टाळा...
महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच आहे. वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च आदींचा सर्व खर्च वीज बिल वसुलीवरच अवलंबून आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू वीजबिलांचा प्राधान्याने भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.