ग्रामीण महाराष्टच्या समृद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार : प्रभाकर देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:18 PM2018-05-30T16:18:23+5:302018-05-30T16:18:23+5:30
सोलापूर : प्रशासनात काम करीत असताना शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या. ग्रामीण महाराष्टच्या समृद्धीसाठी नेमके काय करावे लागेल, याचा अनुभव आला. सेवानिवृत्तीनंतरही सध्या माणदेश फाउंडेशनच्या माध्यमातून गटशेती, कौशल्य विकास, जलसंधारण, शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काम करीत असल्याची माहिती पुण्याचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
प्रभाकर देशमुख यांनी ‘लोकमत भवन’ला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी ‘लोकमत’चे संपादक राजा माने आणि सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. देशमुख पुढे बोलताना म्हणाले, भविष्याचा विचार केला तर पाणी आणि शिक्षण हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांवर योग्यरीतीने काम केल्यास ग्रामीण महाराष्टचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. देशमुख यांनी विविध पदांवर काम केले आहे. पंढरपूर, सोलापूर, पुणे, बारामती, पुणे अशा अनेक ठिकाणी काम केले आहे. कोल्हापूरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना लोकसहभागातून शाळांची सुधारणा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राबविला. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे नूतनीकरण (आयएसओ) करून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र सुधारणा केली. यामुळे गुणवत्ताही वाढली. हा ‘कोल्हापूर पॅटर्न’ महाराष्टत अनेक ठिकाणी राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांची गळती थांबल्याचे देशमुख यांनी सांगितले.
पुण्यातील राजर्षी शाहू अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देण्यात येत आहे. १० हजार मुलांना असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील ६ हजार ७०० मुले सध्या व्यवसाय किंवा नोकरी यशस्वीपणे करीत आहेत. स्पर्धा परीक्षेबाबतही युवकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी पुण्यातील नामांकित ३४ संस्थांशी सहकार्याचा करार केला आहे. २०११ आणि २०१२ अशी दोन वर्षे राज्यात सलग दुष्काळ पडला. शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या धर्तीवर ‘जलयुक्त गाव’ ही योजना माझ्या प्रयत्नातून सुरू केली. लोकचळवळीतून केलेल्या कामांद्वारे आठ टीएमसी पाणी साठल्याचे देशमुख यांनी सांगितले. एक टीएमसी पाणी साठविण्यासाठी शासनाला ३०० कोटी खर्च येतो. आठ टीएमसी पाणी साचल्यामुळे शासनाचे २४०० कोटी रुपये वाचले आहेत, असे देशमुख म्हणाले.
गटशेतीचा लाभ
- अल्पभूधारक शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करण्यासाठी माणदेश फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रभाकर देशमुख म्हणाले. १५-२० शेतकरी एकत्र आल्यास उत्पादन, दर्जा आणि मार्केटिंगसंदर्भातली दोन दिवसीय कार्यशाळा सध्या फाउंडेशनच्या वतीने गरजेनुसार घेण्यात येते. या कार्यशाळेत शरद पवार यांची शेतीवरील भाषणे आणि सर्व क्षेत्राील तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
‘वृक्ष माझा सखा’
- माण तालुक्यात माणदेश फाउंडेशनच्या वतीने ‘वृक्ष माझा सखा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व शाळांमधील १० हजार ५०० मुलांना झाड दिले. या झाडाचे ५२ आठवडे संवर्धन करायचे. यानंतर वृक्षसंवर्धनावर निबंध लिहायचा, असा आगळा-वेगळा उपक्रम राबविल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धनाचे काम झाल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.