Maharashtra Election 2019; सोलापुरात येऊन प्रकाश आंबेडकरांनी केली पालकमंत्र्यांवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:25 PM2019-10-18T12:25:19+5:302019-10-18T12:28:44+5:30
इंदिरा गांधी स्टेडियमवर सभा; उजनीत पाणी असतानाही सोलापूरकरांना ते मिळत नसल्याची व्यक्त केली खंत
सोलापूर : सोलापूर शहर मँचेस्टरसारखे होऊ शकले असते. मात्र येथील सत्ताधाºयांनी याकडे लक्ष दिले नाही. तसेच शहरात सध्याच्या परिस्थितीतही सोलापूरकरांना रोज एक तास पाणी देता येऊ शकत असताना इथल्या सत्ताधाºयांना हे पाणी सोलापूरकरांना देता आले नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता केली.
पार्क चौक येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्य कार्यकारिणी सदस्य अमृता अलदर, संतोष पवार, आॅल इंडिया उलेमा बोर्डाचे अध्यक्ष नायब अन्सारी, आनंद चंदनशिवे, इम्तियाज पीरजादे, युवराज राठोड आदी उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, संपूर्ण जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सत्तेचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. काही भाग शहरात तर काही भाग जिल्ह्याच्या इतर ठिकाणाहून नियंत्रित करावा लागेल. असे झाले तर येथून होणारे स्थलांतर थांबू शकते. सध्याचे सरकार हे फक्त पाट्या टाकण्याचे काम करत आहे. ७० वर्षांपासून सुरु असलेला ट्रॅक काढून त्याजागी नवा ट्रॅक उभा करण्याची गरज आहे. सध्या राज्यात ५ टक्के जास्त वीज तयार होत आहे, या जास्तीच्या विजेसाठी वापरले जाणारे पाणी दुष्काळी भागात पोहोचविता येऊ शकते. उजनीच्या धरणातील गाळ काढल्यास या धरणात आणखी पाणी साठवता येऊ शकेल.
भाजप-सेनेचे सरकार आल्यापासून २ लाख कंपन्या बंद पडल्या. मोठ्या कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी छोट्या कंपन्यांचा बळी घेतला. राज्य सरकारने आपल्या डोक्यावरील कर्ज कमी करण्याऐवजी वाढविले. देशातील सर्वांनी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे जीएसटीवरील भाषण ऐकायला हवे. जीएसटी व नोटाबंदीमुळे देश आर्थिक संकटात कसा सापडला हे कळेल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
सीतारामन यांचे ऐकायचे की, त्यांच्या पतीचे
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने देशाची अर्थव्यवस्था वाईट असून, पंतप्रधान मोदी व सीतारामन यांना माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्यांची भेट घेऊन अर्थव्यवस्था कशी सुधारायची हे विचारा, असे सांगितले. काही दिवसांनंतर अर्थमंत्री सितारमण यांनी बँका चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले. आता प्रश्न असा पडतो की सीतारामन यांचे ऐकायचे की त्यांच्या पतीचे, असा प्रश्न उपस्थित करुन सध्या देशातील बँकांचा एनपीए हा ७२ वरुन ७६ टक्क्यांवर गेला असल्याने देशावरील आर्थिक संकट हे दूर झाले नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.