प्रक्षाळपूजेने पांडुरंगाचे नित्योपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:02+5:302020-12-05T04:48:02+5:30
पंढरपूर : येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी प्रक्षाळपूजेचा उत्सव पार पडला. केशरयुक्त पाण्याच्या स्नानानंतर येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेस प्रक्षाळपूजेनिमित्त खास पुरण-पोळीचा ...
पंढरपूर : येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी प्रक्षाळपूजेचा उत्सव पार पडला. केशरयुक्त पाण्याच्या स्नानानंतर येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेस प्रक्षाळपूजेनिमित्त खास पुरण-पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. कार्तिकी यात्रेमध्ये भक्तांना २४ तास दर्शन देऊन थकलेल्या श्रीविठ्ठलाचा थकवा किंवा शिणवटा जावा म्हणून परंपरेनुसार श्रीविठुरायाला रात्री आयुर्वेदिक काढादेखील दाखविण्यात आला.
विठ्ठलाला आलेला थकवा किंवा शिणवटा काढण्यासाठीच आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर एक चांगला (शुभ) दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव साजरा करण्यात येतो, अशी पूर्वापार परंपरा आहे. त्यानुसार शुक्रवारी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. त्या अगोदर श्रीविठुरायाच्या मूर्तीच्या पायावर चांदीचे कवच ठेवून त्याला लिंबू, साखर लावण्यात आली.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर महाराज यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते रुक्मिणीमातेची पूजा करण्यात आली. श्री विठ्ठलाचा पलंगदेखील शयनघरात पूर्ववत लावण्यात आला. यात्रेच्या कालावधीत दिवसरात्र भक्तांना दर्शन देऊन थकलेल्या विठुरायाचा शिणवटा नाहिसा व्हावा, यासाठी त्याला रात्रीच्या वेळी विविध पदार्थांपासून बनविलेल्या खास आयुर्वेदिक काढादेखील दाखविण्यात आला. प्रक्षाळपूजेपासून मंदिरातील श्री विठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू झाले.
मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
प्रक्षाळपूजेनिमित्त श्रीविठ्ठल मंदिरात आकर्षक विविध प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. यामध्ये झेंडू, ऑरकेट, गुलाब, कारनेशन, आष्टर, शेवंती, ॲनथेरीयम, काकडा, तुळशी, आवळा, चाफा, कामिनी, ग्लॅडीओ, जुई, तगर, कन्हेर, निशिगंध, अशोकांची पाने व फुलांचे तसेच पायनापल व मोसंबी या फळांपासून साधारणत: १० ते १५ रंगसंगती वापरून आरास करण्यात आली. पुणे येथील राजूशेठ मोहिते, राहुल ताम्हणे, राजेंद्र नाईक, अमोल शेरे यांनी या सजावटीसाठी लागणारी फुले मंदिर समितीला मोफत दिली आहेत. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी मंदिरात तसेच श्रीविठ्ठल आणि श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास फुलांनी सजविले होते.
फोटोआळी :
०४पंड०५
प्रक्षाळपूजेनंतर श्रीविठ्ठल-रुक्मिणीला शुक्रवारी आकर्षक वस्त्रे परिधान करून पारंपरिक अशा विविध प्रकारच्या सोन्याच्या दुर्मीळ अलंकारांनी सजविण्यात आले होते.