प्रशांत परिचारकांची तुलना थेट विठ्ठलाशी; जयसिध्देश्वर महाराजांचे वादग्रस्त वक्तत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:30 PM2019-04-10T12:30:07+5:302019-04-10T12:31:43+5:30
प्रशांत परिचारक यांच्या कानात सांगणे म्हणजे विठुरायाला सांगितल्याप्रमाणेच !
पंढरपूर : आ. प्रशांत परिचारक यांच्या कानात समस्या सांगणे म्हणजे विठुरायाला सांगितल्याप्रमाणेच आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांनी गोपाळपूर येथील प्रचार सभेत केले. आ. प्रशांत परिचारक यांची तुलना थेट विठ्ठलाशी केल्याने जयसिध्देश्वर पुन्हा चर्चेत आले आहेत.
जयसिद्धेश्वर हे गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी आ. प्रशांत परिचारक, माजी सभापती वामनराव माने, वसंतराव देशमुख, दिलीप गुरव, दत्तात्रय गुरव, विजया जगताप, हरीश गायकवाड व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जयसिद्धेश्वरांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते पहिल्यांदाच पंढरपूर तालुक्यात आले होते. त्यांचे भाषण सुरु असताना त्यांना सचिन सासवडकर या तरुणाने गावातील सत्ताधारी मंडळी गटारींच्या समस्या सोडवत नसल्याची तक्रार केली. त्याला उत्तर देताना जयसिद्धेश्वर म्हणाले, ‘ए बाळ तू त्रास करुन घेऊ नकोस, तुमच्या समस्या परिचारक मालकांच्या कानात सांगितल्या की विठुरायाला सांगण्यासारखे आहे’ त्यानंतर तत्काळ आ. प्रशांत परिचारक यांनी त्या तरुणाची समजूत काढली.
नेते खातात आईस्क्रीम
डॉ. जयसिध्देश्वरांना प्रचार सभेत गोपाळपूर येथील तरुण प्रश्न विचारत होता. यावेळी वामनराव माने, वसंतनाना देशमुख, हरीश गायकवाड, दिलीप गुरव, विजया जगताप, दत्तात्रय गुरव व अन्य उपस्थित नेते आईस्क्रीम खाण्यात दंग होते.