्रपंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:10 PM2018-05-30T16:10:27+5:302018-05-30T16:10:27+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत शासन आदेशही पारित झाला आहे.
पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत शासन आदेशही पारित झाला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ असून, डॉ. अतुल भोसले यांनी अल्पावधीतच श्री विठ्ठल देवस्थानचा कायापालट करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची दखल घेऊन शासनाने त्यांना हा दर्जा दिला आहे.
आषाढी यात्रेच्या वेळी भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची राज्य शासनाने पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर डॉ.भोसले यांनी मंदिराचा विकास व भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी अनेक उपक्रम राबविण्याबरोबरच प्रयत्नही केले. महाराष्ट्रासह कर्नाटक व आंधप्रदेशातून येणाºया भाविकांना सुलभरित्या दर्शन मिळावे, यासाठी डॉ.भोसले यांनी येत्या आषाढीपासून तिरुपती व शिर्डीप्रमाणे टोकन पद्धत सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. संत साहित्याचे संशोधन व्हावे आणि त्याचा प्रसार व्हावा, या उद्देशाने स्वतंत्र संत विद्यापीठ उभारण्यास डॉ. भोसले प्रयत्नशील असून,त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम महाराज संतपीठ नावाची संस्था स्थापन करण्यासाठी १५ नामवंत तज्ज्ञांची समिती गठीत केली आहे.
मंदिराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने सहकार्य करण्यास मान्यता दिली असून, याबाबत दोन्ही देशांच्या स्तरावर चर्चा सुरू आहेत. ३५० खोल्यांच्या भक्त निवासाचे काम, शुद्ध पिण्याचे पाणी, पंढरीत पाच ठिकाणी वॉटर एटीएम, श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान मोबाईल अॅप, महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात चेजिंग रूम, २४ किलो सोने आणि ८०० किलो चांदी वितळवून विठ्ठल चरणातील विटांच्या स्वरूपात वस्तू तयार करण्याचा निर्णय, लाडू प्रसाद, कर्मचाºयांना गणवेश असे अनेक निर्णय दहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी असून, या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊन त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाचा सन्मान केला आहे. पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी येणाºया लाखो भाविकांना अधिकाधिक सोयी-सुविधा देण्याचा माझा प्रयत्न असून, वारकरी केंद्रबिंदू मानूनच मी यापुढेही कार्यरत राहणार आहे.
-डॉ. अतुल भोसले,
अध्यक्ष, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर