सोलापुरातील ‘प्रिसिजन’ तीन इलेक्ट्रिक घंटागाड्या तयार करून महापालिकेला देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 12:15 PM2021-11-04T12:15:19+5:302021-11-04T12:15:30+5:30
सामंजस्य करार : चाचणी यशस्वी झाल्यानंतर २५० गाड्या रुपांतरित करणार
साेलापूर - प्रिसिजन उद्याेग समूह तीन इलेक्ट्रिक घंटागाड्या तयार करुन महापालिकेला देणार आहे. या तीन गाड्यांची चाचणी यशस्वी झाल्यास पालिकेच्या २५० गाड्या इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरित केल्या जातील. यासंदर्भातील सामंजस्य करार महापाैर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, प्रिसिजन उद्याेग समूहाचे चेअरमन यतीन शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला.
प्रिसिजन उद्याेग समूहाने डिझेलवर चालणाऱ्या प्रवासी बसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रुपांतर केले. आता पालिकेच्या डिझेलवर चालणाऱ्या घंटागाड्यांचे इलेक्ट्रिक गाड्यामध्ये रुपांतर करण्याचा मानस आहे. या गाड्यांच्या रुपांतरित करण्याचा परस्पर सहकार्य करार महापाैरांच्या दालनात झाला. या कार्यक्रमाला प्रिसिजनचे संचालक करण शहा, विराेधी पक्षनेता अमाेल शिंदे, गटनेता आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, चेतन नराेटे, किसन जाधव, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक सुभाष शेजवाल, सहायक आयुक्त श्रीराम पवार आदी उपस्थित हाेते.
---
प्रिसिजनची नेदरलँड येथील इमाॅस कंपनी ट्रक, बस आणि मिलिटरी वाहनांचे पाॅवरट्रेन्स डिझाइन तयार करते. याचे उत्पादन करून पुरवठाही करते. इमॉसने युरोपात आजवर ६०० हून अधिक इलेक्ट्रिक वाहने वितरित केली. या तंत्रज्ञानाव्दारे प्रिसिजनने एक इलेक्ट्रिक बस तयार केली. एआरएआयने या बसची चाचणी प्रमाणित केली. आता तीन घंटागाड्या तयार करणार आहाेत. साेलापूरसाठी नेहमीच आमचे याेगदान राहिले आहे. हा नवा प्रयत्न आहे.
- यतीन शहा, चेअरमन, प्रिसिजन.
----
पालिकेतील घंटागाड्यांच्या इंधनासाठी दरमहा सहा काेटी रुपयांचा खर्च हाेताे. त्याशिवाय देखभाल दुरुस्तीचा खर्च वेगळा आहे. पालिकेला आणखी घंटागाड्या हव्या आहेत. नव्या गाड्या इलेक्ट्रिकच असाव्यात असा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी शाेध सुरू हाेता. यादरम्यान प्रिसिजन कंपनीच्या इलेक्ट्रिक बसची माहिती मिळाली. दाेघांनी मिळून एक करार करण्याचे ठरले. इलेक्ट्रिक वाहन हे भविष्याची गरज आहे. हे ओळखूनच हा करार केला आहे.
- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.
--