तयारी लोकसभेची ; सोलापूर जिल्ह्यात नव्याने ५७ हजार २१६ मतदार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:01 PM2018-09-01T12:01:48+5:302018-09-01T12:03:06+5:30
प्रारुप मतदार यादी; पुढील दोन महिने सूक्ष्म पुनरिक्षण कार्यक्रम
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारुप मतदार यादी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात ३२ लाख २६ हजार ६८३ मतदारांचा या यादीत समावेश करण्यात आला. जुलै २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीच्या तुलनेत नव्याने ५७ हजार २१६ मतदार वाढले आहेत. त्यावर दावे, हरकती असल्यास ३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा निवडणूक कार्यालय आणि तहसील कार्यालयांमध्ये दाखल करावेत. ज्यांची नाव नोंदणी झालेली नाही त्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १० जानेवारी २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत मोहीम राबविण्यात आली. निवडणूक केंद्रस्तरीय अधिकाºयांच्या माध्यमातून मतदार नोंदणी आणि पडताळणी करण्यात आली. १० जानेवारी रोजी झालेल्या मतदार यादीत ३२ लाख २६ हजार ६८३ मतदारांचा समावेश होता. या यादीची पुन्हा छाननी करण्यात आली. यात पुन्हा १९ हजार ६९ मतदारांची वाढ झाली तर २९ हजार ६४३ नावे विविध कारणांनी वगळण्यात आली. १ लाख ७ हजार ६९ मतदारांबाबत विविध प्रकारच्या दुरुस्त्या करण्यात आल्या. नव्या मतदार यादीत १६ लाख ९५ हजार ७२४ पुरुष मतदारांचा तर १५ लाख ३० हजार ९०९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. ५० तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. सर्व राजकीय पक्षांनी शनिवारपासून सुरू होणाºया मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, मध्य, शहर उत्तरमध्ये मतदार घटले
- ३१ जुलै २०१४ मध्ये जाहीर झालेल्या मतदार यादीनुसार अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात ३ लाख २८ हजार २०६ मतदार होते तर नव्या यादीत ३ लाख २३ हजार २३ मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात ४ हजार ९७५ मतदारांची घट झाली आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात २ लाख ९० हजार ४५२ मतदार होते.
नव्या यादीत २ लाख ८३ हजार ४०४ मतदारांचा समावेश असून ७ हजार ४८ मतदारांची घट झाली आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात २ लाख ७३ हजार ५९१ मतदार होते तर नव्या यादीत ही संख्या २ लाख ७२ हजार ७०६ वर पोहोचली आहे. येथेही ८८५ मतदार घटले आहेत. शहर उत्तरमध्ये २ लाख ६९ हजार ९१६ मतदार होते, आता २ लाख ६३ हजार ३५ मतदारांचा समावेश आहे. करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ या मतदारसंघातील मतदार संख्या वाढली आहे.
निवडणूक लवकर झाल्यास हीच यादी
- निवडणूक आयोगाने प्रारुप मतदार यादीवर विशेष लक्ष देऊन काम करण्याचे संकेत दिले होते. प्रस्तावित मतदार पुनरिक्षण कार्यक्रमानुसार ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. साधारणत: मार्च २०१९ नंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे, परंतु डिसेंबरपूर्वीच आचारसंहिता लागू झाली तर शनिवार, १ सप्टेंबर रोजी जाहीर झालेली प्रारुप मतदार यादी अंतिम मतदार यादी समजली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.