सोलापुरात गणेशोत्सवाची तयारी; मोबाईल गेम विसरून चिमुकले रंगले लेझीम शिकण्यात
By Appasaheb.patil | Published: August 28, 2022 05:47 PM2022-08-28T17:47:13+5:302022-08-28T17:47:50+5:30
मिरवणुकीची तयारी : सरावामध्ये दररोज दोनशे कार्यकर्त्यांचा सहभाग
सोलापूर : प्रत्येक सोलापूरकर बाहेरगावी गेला अन् गणपती मिरवणुकीची चर्चा निघाली, तर सोलापुरी लेझीमच्या मर्दानी पैतरेबाजीबद्दल नक्कीच छाती फुगवून सांगतो. लेझीम येथे मुख्य दोन प्रकारांत खेळले जाते. तालमीच्या पैतरेबाजीतही फरक आहेत अन् प्रत्येक तालमीचा आपल्या वेगळ्या डावावर अभिमान आहे.
गणेशोत्सव आला की महिना-पंधरा दिवस आधीच लेझीमचा सराव गल्लोगल्ली सुरू होतो, हे मात्र नक्की. रात्रीचे आठ वाजले की, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या दिमाखात गल्लीच्या कट्ट्यावर चौकात जमतात, एव्हाना तडमताशा व हलगी वाजवणारे तयारच असतात. हलगीचा कडकडाट चालू झाला की कार्यकर्त्यांच्या रांगा तयार होतात अन् सुरू होतात, एक ते दहा डावांचे पदलालित्य. सलामी, गिरकी, दंड, बैठका... सोलापूरकरांना लेझीमचं इतकं आकर्षण आहे की, हलगीचा आवाज घुमला की पाय चौकाकडे आपोआप वळतात. मोबाईल गेम खेळण्याच्या जमान्यात ढोल-ताशांचा आवाज घुमू लागला की, चौकाकडं पाय वळवून नवीन पिढीतील बच्चे कंपनीलाही या खेळाचं आकर्षण आहे.
--------
४५० कॅलरीज कमी होतात.
लेझीमचे डाव खेळताना पाच ते सहा हजार पावलं चालण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते. साधारण फिटनेससाठी रोज दहा हजार पावलं चालणे आवश्यक असते, ते या सरावामुळे पूर्ण होते. महिनाभर चालणाऱ्यांप्रमाणे रोजच्या तासाभराच्या सरावाने महिनाभरात पाच-सहा किलो वजन कमी होते, तसेच महिनाभर केलेल्या लेझीमच्या सरावाने वर्षभराचा स्टॅमिना तयार होतो.
---------
या मंडळांच्या लेझीमचं आकर्षण
सोलापुरात विसर्जन मिरवणुकीत मंडळं एकापाठोपाठ एक चित्ताकर्षक लेझीम खेळून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. श्रद्धानंद समाजाचा आजोबा गणपती मध्यवर्ती मिरवणुकीत अगदी शेवटी असतो; रात्री उशिरा मिरवणूक निघते; पण या मंडळाचं लेझीम पाहण्यासाठी गर्दी होते. मंगळवेढा तालमीचे विशिष्ट मर्दानी डाव पाहण्यासाठी दरवर्षी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी असते. पत्रा तालीम मंडळाचे लेझीमही अत्यंत शिस्तबद्ध आणि आकर्षक असते. सोलापूरकरांना या मंडळाच्या लेझीमच्या डावांचं आकर्षण आहे. पाणीवेस तालमीची मिरवणूक दत्त चाैकातून निघते. ती निघतानाच मंडळासमोर उत्तम डाव रंगतो. तो पाहण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करतात.
---------
मोबाईल गेम विसरून चिमुकले रंगले लेझीम शिकण्यात
गणेशोत्सव आला की उत्साहाला उधाण.. ढोल-ताशांचे आवाज... गल्लीतल्या चौकात घुमू लागले की टीव्ही, मोबाईल सोडून चौक गाठतात... लेझीमच्या पैतऱ्यांचा ठेका म्होरक्याच्या हाताच्या अन् इशाऱ्यावर बदलतात डाव....नवीन पिढीतल्या लहान मुलांचा लेझीमचा डाव बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते.