लोकसभेच्या निवडणुकीची तयारी ; छायाचित्र नसेल तर मतदार यादीतून नाव वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:48 AM2018-04-19T11:48:27+5:302018-04-19T11:48:27+5:30
निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ पूर्वी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.
सोलापूर : मतदार यादीत मतदारांचे रंगीत छायाचित्र असणे आवश्यक आहे. मतदारांचे फोटो गोळा करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु, ज्यांचे छायाचित्र मतदार यादीत नसेल त्यांचे नाव वगळण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ पूर्वी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. १० जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात १६ लाख ९८ हजार ६३३ पुरुष तर १५ लाख ३१ हजार ४११ महिला मतदार आहेत. ५३ तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे.
२०१८ च्या जनगणनेनुसार १८ वर्षांवरील लोकसंख्या व प्रत्यक्ष मतदार नोंदणीमध्ये तफावत आहे. त्यामुळे मतदार यादीत मयत, स्थलांतरित व दुबार मतदार नोंदणीची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी सुरू आहे. मयत, स्थलांतरित व दुबार मतदार वगळण्याचे काम सुरू आहे. मतदार यादीत महिलांची नोंदणी वाढविण्याचे काम सुरू आहे.
५ लाख मतदारांकडे कृष्ण-धवल ओळखपत्र
- सोलापूर जिल्ह्यात रंगीत फोटो असलेल्या मतदारसंख्या १ लाख ४७ हजार ४० एवढी आहे. कृष्ण-धवल मतदारसंख्या असलेल्या मतदारांची संख्या ५ लाख ४५ हजार ३९ इतकी आहे. या मतदारांच्या याद्या तहसील कार्यालयांकडे उपलब्ध आहेत. त्याशिवाय ७३३९ मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र अथवा ओळखपत्र नसल्याचे लक्षात आले आहे. कृष्ण-धवलच्या जागी रंगीत छायाचित्र जोडण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी जिल्ह्यात एकूण ३२९० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांनी नियुक्ती केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
रंगीत फोटो देऊन सहकार्य करा
- मतदारांना रंगीत ओळखपत्र दिले जात आहे. ज्या मतदाराकडे पूर्वीचे १६ अंकी क्रमांकाचे कृष्ण-धवल व रंगीत मतदार ओळखपत्र आहे त्या मतदारांचे फोटो गोळा करून त्यांना नवीन १६ अंकी ओळखपत्र देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे आजही कृष्ण-धवल ओळखपत्र आहे, अशा मतदारांनी आपले लगतच्या कालावधीत काढलेले फोटो संबंधित तहसील कार्यालय अथवा मतदार यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांकडे द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.