मुंबई-सोलापूर विमानसेवेसाठी तयारी
By admin | Published: July 12, 2014 12:39 AM2014-07-12T00:39:47+5:302014-07-12T00:39:47+5:30
सोलापुरात बैठक : विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुढाकार
अकलूज : सोलापूर ते मुंबई विमानसेवा देण्यासाठी एक खासगी कंपनी तयार झाली असून, त्या संदर्भातील धोरण आखण्यासाठी उद्या सोलापूर येथे महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
सुप्रीम एव्हिएशन इअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सोलापूर ते मुंबई अशी दैनंदिन विमानसेवा देण्यास राजी झाली आहे. या कंपनीचे अध्यक्ष अमित अग्रवाल यांच्याशी आपली प्राथमिक चर्चा आज झाली असल्याचे खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. या बैठकीत अमित अग्रवाल यांनी सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यास आपण तयार आहोत, असे खा. मोहिते-पाटील यांना सांगितले. या विमानसेवेची पुढील ध्येयधोरणे ठरवण्यासंदर्भात उद्या दि. १२ रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी २ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सुप्रीम एव्हिएशन इअर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष अमित अग्रवाल, सोलापूरमधील चेंबर आॅफ कॉमर्सचे पदाधिकारी, सदस्य, आमदार, सोलापूरच्या महापौर अलका राठोड आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कंपनीने विमानसेवा सुरू केल्यानंतर सोलापूरवरून विमानाची निघण्याची वेळ व मुंबईहून परत येण्याची वेळ या संदर्भातील सविस्तर चर्चा या बैठकीत होणार आहे. या बैठकीसाठी सोलापूरमधील संबंधित पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खा. मोहिते-पाटील यांनी केले आहे. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापूरच्या विकासात आणखी भर पडणार आहे. त्याशिवाय जिल्ह्याच्या दृष्टीनेही ही विमानसेवा महत्त्वपूर्ण असल्याचे खा. मोहिते-पाटील यांनी सांगितले.
सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी नित्य विमानसेवा असावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आली आहे. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर येथील दळणवळणाला गती प्राप्त होईल. त्यासाठी अशी विमानसेवा सुरू करण्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू होते. अनेक खासगी विमान कंपन्यांशी या संबंधात चर्चा सुरू होती. त्यातून आता सुप्रीम एअर एव्हिएशन एअर इंडिया प्रा. लि. या कंपनीने ही सेवा देण्यास सहमती दाखविल्याने सोलापूरची नित्य विमानसेवा लवकर सुरू होणे अपेक्षित आहे, असे खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)