सोलापुरात शिवजन्मोत्सवाची तयारी; नऊवारी साड्या अन् कपाळावर चंद्रकोर लेवून शेकडो सुवासिनी करणार कौतुकाचा पाळणा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:15 PM2019-02-07T14:15:53+5:302019-02-07T14:21:35+5:30
सोलापूर : नऊवारी साड्या परिधान केलेल्या सुवासिनी... कपाळावर चंद्रकोर अन् नाकात नथ... नटून-थटून आलेल्या या शेकडो सुवासिनींच्या उपस्थितीत यंदा ...
सोलापूर : नऊवारी साड्या परिधान केलेल्या सुवासिनी... कपाळावर चंद्रकोर अन् नाकात नथ... नटून-थटून आलेल्या या शेकडो सुवासिनींच्या उपस्थितीत यंदा प्रथमच शिंदे चौकातील डाळिंबी आड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी पाळण्याच्या सोहळ्यात शिवबांचा जयजयकार होणार आहे. या सोहळ्यानं ‘बदलतं सोलापूर-बदलती परंपरा’याची प्रचिती शिवजयंतीदिनी शिवप्रेमींना येणार आहे.
गणेश जयंती, दत्त जयंती, बसव जयंती, अक्कमहादेवी जयंती आदी देवदेवता अन् महापुरुषांच्या जयंतीदिनी पाळण्याचा प्रमुख कार्यक्रम असतो. विशेषत: या सोहळ्यात सुवासिनींचा अधिक सहभाग असतो. हाच धागा पकडून यंदा मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोडगे यांना ही कल्पना सूचली. त्यांनी महामंडळाचे पदाधिकारी, समाजातील मान्यवरांशी चर्चा केल्यावर त्यांनीही ही कल्पना उचलून धरली. त्यानंतर सागवानापासून बनविलेला पाळणा कार्यक्रमात दिसणार असून, त्या पाळण्यास फ्रेंच पॉलिशही करण्यात आले आहे. आकर्षक विविध रंगांच्या फुलांनी हा पाळणा सजविण्यात येणार असून, पाळणावेळी होणारे विधी झाल्यावर बाल शिवबांचा जयजयकार होणार आहे. यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.
यंदाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडही सरसावली आहे. प्रवीण गायकवाड, संभाजी भोसले, नागेश पवार, सीताराम बाबर, आशुतोष माने, श्रीकांत सुरवसे, अरविंद शेळके, सतीश माडकर, संजय भोसले, रोहित कसबे, सुलेमान पीरजादे, अविनाश फडतरे, इलियास शेख, मल्लय्या स्वामी, अनिल कोकाटे आदी जयंती उत्सवात आधुनिकता आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
रांगोळी काढा, तोरणे बांधा- अभिंजली जाधव
- शिवजयंतीदिनी घरांसमोर रांगोळ्या काढा, तोरणे बांधा, भगवे ध्वज उभे करा, असे आवाहन करताना जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा अभिंजली जाधव यांनी सकाळी ७ वाजता शिवपूजन, त्यानंतर जिजाऊ वंदन करण्याचे आवाहन केले आहे. जसे दिवाळीत गोडधोड करतो, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी गोडधोड करुन त्याचा आस्वाद घ्यावा. त्याचवेळी शिवरायांच्या विचारांचं मंथनही करा, असेही त्यांनी आवाहन केले आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली जयंती उत्सवात डाळिंबी आड येथील पाळणा कार्यक्रम नेटका होण्यासाठी उज्ज्वला गव्हाणे, संजीवनी मुळे, वर्षा मुसळे, पल्लवी चवरे, माधुरी चव्हाण आदी परिश्रम घेत आहेत.
मदरसामधील मुलांच्या हस्ते प्रतिष्ठापना
- जुळे सोलापुरातील डी-मार्टसमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने यंदा शिवजयंती सोहळ्यात मुस्लीम समाजाचा सन्मान करण्यात येणार आहे. नई जिंदगी येथील अल-फुरकानच्या मदरसा (शाळा) येथील मुलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यावेळी मदरसाचे प्रमुख मौलाना हरीस यांच्यासह ३० ते ३५ मुले उपस्थित राहणार असल्याचे श्याम कदम यांनी सांगितले.
मनामनांत... घराघरांत शिवजयंती- श्याम कदम
- संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे महानगराध्यक्ष श्याम कदम यांनी यंदा ‘मनामनांत... घराघरांत शिवजयंती’चा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी अख्खे जुळे सोलापूर भगवेमय होण्यासाठी प्रत्येक शिवप्रेमींनी आपल्या घरांवर, दुकानांवर छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रे असलेले भगवे ध्वज लावावेत, असे आवाहन कदम यांनी केले आहे.
- याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह शाहू-फुले-आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिवजयंती मिरवणुकीत सहभागी शिवजन्मोत्सव मंडळांना छत्रपतींवरील पुस्तके भेट स्वरुपात देण्याचेही त्यांनी नियोजन केले आहे.