इकडं स्वत:च्या घरी भावाच्या अंत्ययात्रेची तयारी; तिकडं वाचकांच्या घरी पेपर टाकण्याचीच स्वारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:35 PM2019-10-15T12:35:53+5:302019-10-15T12:39:18+5:30

राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन; चैतन्य वाघमारेंसारख्या अनेक बांधवांच्या संघर्षाची अनोखी कहाणी

Prepare for a brother's funeral at his own home; Throwing paper away from the readers' home! | इकडं स्वत:च्या घरी भावाच्या अंत्ययात्रेची तयारी; तिकडं वाचकांच्या घरी पेपर टाकण्याचीच स्वारी !

इकडं स्वत:च्या घरी भावाच्या अंत्ययात्रेची तयारी; तिकडं वाचकांच्या घरी पेपर टाकण्याचीच स्वारी !

Next
ठळक मुद्देसकाळी एक दिवस जरी हातामध्ये पेपर आला नाही तर त्या दिवशी करमत नाहीआपल्या हातात हा पेपर देण्यासाठी अनेक हात राबत असतातआपल्या ग्राहकांपर्यंत पेपर वेळेत पोहोचावा यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांची धडपड

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : बरोबर दोन वर्षांपूर्वी माझ्या सख्ख्या भावाचे निधन झाले होते. दुसºया दिवशी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते. नातेवाईकांना अंत्यसंस्काराची माहिती दिली होती. ते येण्यापर्यंत वाट पाहावी लागणार होती. माझा भाऊ तर गेला होता, त्यामुळे मी दु:खात होतो. यासोबत मला आणखी एक चिंता होती, ती म्हणजे पहाटे ग्राहकांच्या घरी पेपर कोण देणार ? याची. कोणत्या घरी कोणता पेपर द्यायचा हे माझ्याशिवाय कुणालाच माहिती नव्हते. यामुळे काही झाले तरी आपल्या ग्राहकांपर्यंत पेपर पोहोचवायचा असा निश्चय केला. नेहमीप्रमाणे पहाटे उठून दत्त चौक येथे पेपर घेऊन घरोघरी वाटत असताना माझ्या घरी भावाच्या अंत्ययात्रेची तयारी सुरु होती. हे करत असताना मला वाईट वाटत होते पण काम करणे गरजेचे होते, हा अनुभव चैतन्य वाघमारे यांनी सांगितला.

सकाळी एक दिवस जरी हातामध्ये पेपर आला नाही तर त्या दिवशी करमत नाही. आपल्या हातात हा पेपर देण्यासाठी अनेक हात राबत असतात. 

यापैकी महत्त्वाचा दुवा म्हणजे वृत्तपत्र विक्रेते. पेपर विक्रेते चैतन्य वाघमारे यांना जसे अनुभव आले, तसे अनेकांना अनुभव आले आहेत. आपल्या ग्राहकांपर्यंत पेपर वेळेत पोहोचावा यासाठी ही धडपड सुरु असते. पाऊस आणि थंडी याची पर्वा न करता आपली झोपमोड करत पहाटे चार ते सकाळी नऊपर्यंत राबतात. ग्राहकांच्या इतर तक्रारींनादेखील तोंड द्यावे लागते. ग्राहकांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात. 
जसे की पेपर गेटला अडकवला पाहिजे, पाऊस आला तर पेपर थेट घरात टाकायचा, पेपरला घडी पडू नये, रोज सकाळी आठच्या आतच पेपर यायला हवा, दुसरा पेपर आल्यास चालणार नाही, अशा अडचणींना पेपर विक्रेत्यांना तोंड द्यावे लागते. हे करत असतानाही कोणताही खंड न पडता आपल्या घरी रोज पेपर येत असतो. अशाच काही पेपर विक्रेत्यांनी सांगिलेला हा अनुभव...

मागील ४० वर्षांपासून घरोघरी पेपर देण्याचे काम करत आहे. हे काम आधी सायकलवर करायचो, आता गाडीवरुन करत आहे. कामाची इतकी सवय झाली आहे की याचा कधी त्रास वाटत नाही. सकाळी कामासोबत व्यायामही होतो.
 - राचप्पा आळंगे, वृत्तपत्र विक्रेते.

माझ्या वडिलांपासून पेपरचा व्यवसाय करत आहे. मी अभियंता असून, काही वर्षे सैनिक म्हणून काम केले, निवृत्त झाल्यानंतर पुन्हा हा व्यवसाय करत आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या वाड्या-वस्त्यापर्यंत पेपर पोहोचावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो.
- उत्तम चौगुले, सांगोला, अध्यक्ष, जिल्हा पेपर विक्रेता संघ

पेपर वाटण्यासाठी मुले आली नसल्यास अनेक अडचणी येतात. मात्र वेळेत ग्राहकांच्या घरी पेपर पोहोचविणे गरजेचे असते. ग्राहकांकडून पेपरचे बिल घेणे तसे त्रासदायक असते. अनेकदा काही कारणे सांगून बिल नंतर देतो असे आश्वासन मिळते.
- शिवाजी काकडे, बार्शी, वृत्तपत्र विक्रेते.

पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त अडचणी येतात. कित्तूर चन्नमानगर व स्वामी विवेकानंद परिसरात पावसामुळे चिखल होतो. यामुळे सायकल व गाडी चालविण्यास अडचणी निर्माण होतात तर अपार्टमेंटमध्ये चौथ्या-पाचव्या मजल्यावर जाऊन पेपर देणे जिकरीचे काम आहे.
- शिवलिंग मेडेगार, अध्यक्ष वृत्तपत्र विक्रेता संघ आसरा.

पेपर वाटताना अडचणी आल्या तरी कारण सांगता येत नाही. ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे अंतिम लक्ष्य असते. पहाटे ४ वाजता सुरु झालेला प्रवास सकाळी १० वाजेपर्यंत सुरु असतो. एखाद्या दिवशी पेपर नाही दिला तर ग्राहक पेपर बंद करण्याची शक्यता असते.
- चैतन्य वाघमारे, अध्यक्ष, सोलापूर शहर वृत्तपत्र विक्रेता बहुउद्देशीय संघ

आमचे कुटुंब हे १९५५ पासून या व्यवसायात आहे. सुरुवातीला पूर्ण शहरात पेपर देण्याचे काम करायचो. आता शहर मोठे झाल्याने शहराच्या मोठ्या भागात पेपर देतो. सकाळी ठराविक वेळेत पेपर देणे महत्त्वाचे असते.
- दिलीप भागवत, वृत्तपत्र विक्रेता संघ आसरा.

Web Title: Prepare for a brother's funeral at his own home; Throwing paper away from the readers' home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.