अवैध व्यावसायिकांशी संबंधीत पोलिसांची यादी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:41+5:302021-02-06T04:40:41+5:30
पंढरपूर : अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंशी पोलिसांचे हितसंबंध असू नयेत. अवैध व्यवसायाशी निगडीत असलेल्या पोलिसांची यादी तयार केली आहे. ...
पंढरपूर : अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंशी पोलिसांचे हितसंबंध असू नयेत. अवैध व्यवसायाशी निगडीत असलेल्या पोलिसांची यादी तयार केली आहे. त्यातील काहींना मुख्यालयात बोलावून मार्गदर्शन केले आहे. नंतर अन्य पोलीस ठाण्यात पाठवले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तेजस्वी सातपुते शुक्रवारी पंढरपूर येथे आल्या होत्या. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गाडेकर, प्रशांत पाटील उपस्थित होते.
दुसऱ्या यादीतील ३५ पोलीस कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवसात मुख्यालयात शिबिरासाठी बोलावून घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करताना गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाळूवरही मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असल्याने नागरिकातून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याचे त्या म्हणाल्या. अवैध धंदे करणाऱ्यांवर स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीची कारवाई सुरू आहे. मात्र, जेथे किरकोळ कारवाई असेल, तेथे माझे पथक पोहोचेल व योग्य कारवाई करेल, असे सांगितले.
आषाढीपूर्वी सीसीटीव्ही प्रकल्पाचे काम सुरू
पंढरपूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी लाखो भाविकांची गर्दी असते. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी व अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी शहरावर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. सीसीटीव्ही बसविण्याचे काम आषाढीपूर्वी सुरू होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.