खो-खो स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Published: December 23, 2014 09:16 PM2014-12-23T21:16:30+5:302014-12-23T23:47:17+5:30
इचलकरंजी : आंतरप्रांतीय शालेय स्पर्धा; २५ राज्यांचे संघ सहभागी होणार
इचलकरंजी : शहरातील नगरपरिषदेच्या जिम्नॅशियम मैदानावर आंतरप्रांतीय राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा होणार असून, स्पर्धेसाठी क्रीडांगण व प्रेक्षक गॅलरीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरातून २५ राज्यांचे मुला-मुलींचे संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा विभाग व इचलकरंजी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केली असल्याची माहिती क्रीडा उपसंचालक एन. व्ही. मोटे यांनी पत्रकारांना दिली.
जिम्नॅशियम मैदानावर खो-खो साठी चार क्रीडांगणे तयार करण्यात आली असून, एकाचवेळी पंधरा हजार प्रेक्षक सामने बघू शकतील, अशी प्रेक्षक गॅलरी उभारलेली आहे. ही स्पर्धा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून इचलकरंजीत घेण्यात येत आहे. ही स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर दरम्यान होत आहे, असे सांगून उपसंचालक मोटे म्हणाले, स्पर्धेसाठी ६०० खेळाडू, १०० स्वयंसेवक, पंच, गुणलेखक असे सुमारे ८०० लोक सहभागी होतील. त्यांची राहण्याची सोय तेरापंथी भवन, त्यागी भवन, डीकेटीई इंग्लिश स्कूल, शासकीय विश्रामधाम, वेदभवन, आदी ठिकाणी केली आहे. सामने दिवस-रात्र अशा सत्रात होणार असून, स्पर्धेच्या आदल्या दिवशी बहुतेक परराज्यांतील मुला-मुलींचे संघ दाखल होतील.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शहरातील विविध शाळांमधील क्रीडाशिक्षकांच्या विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
अन्य राज्यांतून रेल्वेने येणाऱ्या संघांसाठी मिरज येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. खेळाडूंची ने-आण करण्यासाठी मिरज ते इचलकरंजी अशी वाहतुकीची सोय केली आहे, असे मोटे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)