सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले : केशव उपाध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:39+5:302021-04-12T04:20:39+5:30
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाची निवडणूक शेतकरी हित व शेतकरी विरोधी अशी लढाई आहे. ठाकरे यांनी लॉकडाऊन शब्द ...
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाची निवडणूक शेतकरी हित व शेतकरी विरोधी अशी लढाई आहे. ठाकरे यांनी लॉकडाऊन शब्द उच्चारला अन् द्राक्षांचे भाव घसरले. ठाकरे सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असूनही या सरकारने दीड वर्षात नवा पैसा दिला नाही, असे भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.
पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री बाळा भेगडे, आ. राहुल कुल, शंतनु दंडवते, बादलसिंह ठाकूर उपस्थित होते. पुढे उपाध्ये म्हणाले, खा. संजय राऊत यांनी पुन्हा राजकारण करू नये. गुजरात सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना इंजेक्शन निर्यातीला बंदी घातली असती तर महाराष्ट्रात कोरोना इंजेक्शनचा तुटवडा पडला नसता. कोरोनाबाबत राजकारण थांबवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु त्यांच्या पक्षातील खा. संजय राऊत यांनी पुन्हा राजकारण सुरू केले आहे. यामुळे ठाकरे यांनी प्रथम स्वतःच्या पक्षातील नेत्यांना आवरावे, असेही उपाध्ये यांनी सांगितले.
पवारांनी खालच्या पातळीचे बोलणे चुकीचे : निंबाळकर
पंढरपूर शहर जरी माझ्या मतदार संघात नसले तरीही मी अनेकवेळा पंढरपूर शहरातील प्रश्न मांडले आहेत. या पावन भूमीत उपमुख्यमंत्री अजित पवार खालच्या पातळीवर बोलून गेले आहेत. त्यांनी गल्लीबोळात जाऊन बॅगा पोच करायचं काम केले आहे. राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी असल्याची टीका खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी केली.
फडणवीस सोमवारी पंढरपूर, मंगळवेढ्यात
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्र्वर, मंगळवेढा शहर व पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, गादेगाव, टिळक स्मारक (पंढरपूर शहर) येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सोमवारी होणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.
फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये, खा. रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री बाळा भेगडे, आ. राहुल कुल आदी.