विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार करताना शिलालेखांचे संवर्धन करा, इतिहास प्रेमींची मागणी
By संताजी शिंदे | Published: May 28, 2024 02:34 PM2024-05-28T14:34:02+5:302024-05-28T14:34:29+5:30
सोलापूर : पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शना नुसार पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती मंदिराचा जिर्णोद्धार जलद गतीने करत आहे. त्यामुळे मंदिरास ...
सोलापूर : पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शना नुसार पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती मंदिराचा जिर्णोद्धार जलद गतीने करत आहे. त्यामुळे मंदिरास मूळ स्वरूप प्राप्त होणार आहे. ही घटना महत्वपूर्ण आहे, मात्र जीर्णोद्धार करताना मंदिरातील शिलालेखांचे योग्य जतन व संवर्धन व्हावे अशी मागणी, सोलापूरच्या इतिहास प्रेमी मंडळींनी केली आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंधरा शिलालेख आहेत. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, डॉ.शोभना गोखले, आनंद कुंभार, तुळपुळे, वा.ल. मंजुळ यांनी अथक परिश्रम करून शिलालेखाचे वाचन केले आहे. ते शिलालेख मंदिराच्या भिंतीवर व स्तंभावर आहेत. त्यास कोणतेही इजा पोहचूनये याची दक्षता घेतली जावी. शिलालेख अत्यंत महत्त्वाचे असून, इतिहास संशोधनाच्या संदर्भासाठी त्याचा उपयोग होतो. शिलालेखाची काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत इतिहास प्रेमी मंडळींनी व्यक्त केले.
विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीने समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत, त्यामुळे प्रबोधन चळवळीला गती मिळाली आहे. समितीने एखादे वस्तू संग्रहालय मंदिर परिसरात उभारावे, अशी देखील मागणी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष प्रा.एम.एम. मस्के यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीस प्रा.नामदेवराव गरड, प्राचार्य. डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, प्राचार्य एम.ए. शेख, डॉ. नभा काकडे, इतिहास अभ्यासक नितीन अनवेकर, इतिहास ग्रंथ लेखक डॉ. सत्यव्रत नुलकर, डॉ.दशरथ रसाळ, प्रा.संतोष मारकवाड यांनी दुजोरा दिला आहे.