राष्ट्रवादीचे सपाटे, संतोष पवार यांच्या शर्यतीत काँग्रेसचे प्रकाश वाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:37 PM2019-07-10T12:37:54+5:302019-07-10T12:51:55+5:30

सोलापुरातील पालकमंत्र्यांची सावध भूमिका; शहर उत्तरमध्ये सुरू आहे इच्छुकांची तयारी

The President of the Congress in the race of NCP, Santosh Pawar | राष्ट्रवादीचे सपाटे, संतोष पवार यांच्या शर्यतीत काँग्रेसचे प्रकाश वाले

राष्ट्रवादीचे सपाटे, संतोष पवार यांच्या शर्यतीत काँग्रेसचे प्रकाश वाले

Next
ठळक मुद्देशहर उत्तर विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यामुळे भाजपचा बालेकिल्लाआत्तापर्यंत तीनवेळा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेभाजपमधूनच या मतदारसंघात महापौर शोभा बनशेट्टी यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली

राजकुमार सारोळे

सोलापूर :  पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची ताकद उभी राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यामुळे भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पूर्वी हा मतदार काँग्रेसचा मतदार संघ होता. काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचा पराभव करून त्यांनी हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात घेतला. आत्तापर्यंत तीनवेळा देशमुख यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला मिळालेले मताधिक्य पाहता त्यांनी आपली बाजू सुरक्षित करून ठेवल्याचे दिसून येते. तरीही पालकमंत्री देशमुख यांनी सावध भूमिका ठेवली आहे. भाजपमधूनच या मतदारसंघात महापौर शोभा बनशेट्टी यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबरीने नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते हे गृहित धरून देशमुख यांनी मतदारसंघ एकसंध ठेवण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.

इकडे भाजपचा किल्ला सर करण्याची तयारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री देशमुख हे बाजार समितीचे सभापती झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व विधानसभेचे इच्छुक उमेदवार मनोहर सपाटे यांनी आता भाजपच्या विरोधात निवडणूक जिंकणे अवघड आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. तरीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकासमोर निवडणूक लढविण्याची पुन्हा तयारी दर्शविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनीही या मतदारसंघात इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. 

इकडे काँग्रेसकडून शहराध्यक्ष प्रकाश वाले, राजन कामत, सातलिंग शटगार यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीकडून माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांना तयारी करण्याबाबत सूचित केल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम ठेवावी असा आग्रह धरला जात आहे. असे असताना शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. गेल्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला संधी दिली तरी हा मतदारसंघ काँग्रेसचा होता, त्यामुळे मागणी करण्यास काय हरकत आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी व्यक्त केली आहे. असे असले तरी बुथलेव्हलवर दोन्ही काँग्रेसची तयारी अद्याप झालेली नाही तर भाजपने विविध उपक्रमातून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. विरोधकांचे राजकारण युती व आघाडीचे काय होणार यात अडकले आहे. 

वंचितची ताकद उभी राहणार का?
- लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी शहर उत्तर मतदारसंघातून मोठी ताकद उभी राहिली. सर्व गटतट एकत्र आले. आता विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी तयारी केली आहे.आता त्यांच्याबाजूने सर्व गट एकत्र येणार का हे पहावे लागणार आहे.  नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात काम केले आहे. पालकमंत्री देशमुख यांचे राजकीय विरोधक म्हणून त्यांनी ताकद पणाला लावली आहे.

Web Title: The President of the Congress in the race of NCP, Santosh Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.