अपघात झाल्याचा बनाव करीत कार पेटवली; दोघांना मारहाण करून दहा लाखांचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 09:53 PM2021-11-10T21:53:24+5:302021-11-10T21:53:57+5:30
सांगोला तालुक्यातील घटना; पोलिसांत गुन्हा दाखल
सांगोला: अज्ञात तीन जणांनी कारने फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत अपघात झाल्याचा बनाव करीत दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देऊन रस्त्याशेजारील खड्ड्यात पाडले. ही संधी साधून कारमधील दोघांनी दुचाकीवरील दोघांना दगड व हाताने मारहाण करून एकाच्या पॅन्टच्या खिशातून सुमारे ९ लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम सोन्याची बिस्किटे, ५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल जबरदस्तीने काढून घेवून सुमारे ९ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लुटला व दुचाकीवरून पळून जाताना त्यांनी त्यांची कार पेटवून देवून तेथून धूम ठोकली.
या घटनेत दुचाकीचे सुमारे २ हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना सोमवार ८ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास एखतपुर-अचकदाणी रोडवरील बागलवाडी फाॅरेस्टच्या हद्दीत घडली.
याबाबत सुशांत बापुसो वाघमारे (रा. दिघंची ता. आटपाडी ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी त्या तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहे.