निर्यात थांबल्याने चवदार केशर आंब्याचा भाव घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:21+5:302021-05-17T04:20:21+5:30
जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेत आहेत. यामध्ये आंबा पिकाचा समावेश आहे. कृषी खात्याकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात १७३१ हेक्टर ...
जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेत आहेत. यामध्ये आंबा पिकाचा समावेश आहे. कृषी खात्याकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात १७३१ हेक्टर क्षेत्रात आंबा आहे. यामध्ये प्रामुख्याने केशर जातीचे मोठे क्षेत्र आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आंब्याची शेती केली असून, यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
गतवर्षी आंब्याला फळधारणा झाली नव्हती. आलेला मोहरही गळाला होता. यावर्षी आंबा उत्पादन चांगले आले आहे. मात्र, कोरोनामुळे निर्यात बंद आहे. यामुळे सर्वच आंबा स्थानिक बाजारात विकावा लागतोय. यावर्षी गावरान आंब्याला भरपूर पीक आले आहे. याशिवाय कर्नाटक केशरही सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आला आहे. चवीला चांगला असलेला गावरान आंबा व कर्नाटक केशर बाजारात एकाचवेळी आल्याने दरात घसरण झाली आहे.याचा फटका केशर उत्पादकांना बसला आहे. गुणवत्तेचा केशर आंबा किलोला १०० रुपयाने विक्री होत आहे. त्यामुळे केवळ आंब्याची शेती करणाऱ्या व विक्रीसाठी म्हणून वर्षभर आंबा जोपासणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
----
कोरोनामुळे निर्यात थांबली
यावर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी गुणवत्तेचा आंबा आणला आहे. मात्र, कोरोनामुळे निर्यात थांबली आहे. मार्डीच्या राम फसके यांचा दीड टन आंबा १२५ रुपयांनी निर्यात झाला. मात्र, नंतर कोरोनामुळे निर्यात थांबल्याने स्थानिक बाजारात आंबा विकला जात आहे.
---
निर्यात थांबल्याचा फटका
सोलापूरचा केशर चवीला चांगला आहे. मात्र, कर्नाटक केशर व गावरान आंबा मार्केटमध्ये आल्याने सोलापूर केशरचा दर फारच खाली आला आहे. होलसेलमध्ये ६० रुपयांनी आंबा विकावा लागतोय. कमी दर मिळत असला तरी मार्केटमधून आंबा परत आणता येत नाही.
- राम फसके, केशर आंबा उत्पादक