घरकुलाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदींना आणू
By admin | Published: June 23, 2014 12:58 AM2014-06-23T00:58:52+5:302014-06-23T00:58:52+5:30
आडम मास्तर : महिला कामगार गृहनिर्माण संस्थेची सर्वसाधारण सभा
सोलापूर : अल्पसंख्याक घरकूल प्रकरण अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत घरकुलाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाचारण करू, असा संकल्प माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सोडला.
कुंभारी येथे हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चौथ्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील कामगार महिलांना शासनाकडून घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शासनाच्या नाकर्तेपणामुळे घरकूल निर्मितीच्या कार्याला अपेक्षित गती मिळाली नाही. हा प्रकल्प मार्गी न लागल्यास थेट दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर उपोषण करण्याचा इशाराही आडम यांनी दिला. या सभेसाठी २५ हजार कामगार महिलांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रजा नाट्य मंडळाच्या कलाकारांनी क्रांतीकारी गीते सादर केली. यानंतर कॉ. युसूफ मेजर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नलिनीताई कलबुर्गी, गजेंद्र दंडी, नसीमा शेख, महिबूब हिरापुरे, अजीज पटेल यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास कामिनी आडम, कुंभारीचे सरपंच गुरुनाथ कटारे, अनिल पंधे, बालाजी महेशन, अल्लाबक्ष पटेल, मौला मास्तर,
माशप्पा विटे, कुरमय्या म्हेत्रे, अमोल मेहता, इलियास सिद्धिकी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.