पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापुरात; व्यासपीठ, सभा स्थळावरील तयारीला वेग
By Appasaheb.patil | Published: January 16, 2024 03:21 PM2024-01-16T15:21:55+5:302024-01-16T15:22:48+5:30
हेलिपॅड, व्यासपीठ, आसन व्यवस्था, स्वच्छता, पोलिस बंदोबस्त, नागरिकांची व्यवस्था आदी विविध पातळीवर जिल्हा प्रशासन वेगाने तयारी करीत आहेत.
सोलापूर : रे नगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेेंतर्गत ३० हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे वितरण १९ जानेवारीला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, केंद्र व राज्यातील महत्त्वाचे अधिकारी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. हेलिपॅड, व्यासपीठ, आसन व्यवस्था, स्वच्छता, पोलिस बंदोबस्त, नागरिकांची व्यवस्था आदी विविध पातळीवर जिल्हा प्रशासन वेगाने तयारी करीत आहेत.
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच दोन दिवस अगोदर एसपीजी अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची जवळपास १०० जणांची टीम आज सोलापुरात दाखल होणार आहे. त्यांची करडी नजर असणार आहे. एसपीजी टीम विविध कामांचा व सुरक्षेचा आढावा घेणार आहे. रे नगर येथे घरकुल वितरण कार्यक्रम होत असलेल्या जागेवर व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी व्यासपीठ व व्यासपीठाच्या पाठीमागे आवश्यक कॅम्प ऑफिस, ग्रीन रूम उभारण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थी साठी एन्ट्री पॉईंट व एक्झिट पॉईंट निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी सूचना फलक लावण्यात येणार आहेत.
रेनगर फेडरेशनच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान एक लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता कळवली असल्याने त्या दृष्टीने सभा ठिकाणच्या परिसरात पंढरपूर येथून ४०० शौचालये आणून ठेवली जाणार आहेत. कार्यक्रमावेळी व कार्यक्रमानंतर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या रे नगर परिसरात जिल्हा प्रशासन व पोलिस अधिकारी ठाण मांडून विविध कामावर लक्ष ठेवून आहेत.