लग्नाआधी निघाली ‘लोकशाहीची वरात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:19 PM2019-04-23T12:19:14+5:302019-04-23T12:20:16+5:30
बोहल्यावर चढण्यापूर्वीच माढा लोकसभा मतदारसंघातील कुर्डूवाडी येथील जोडप्याने केले मतदान
सोलापूर : लोकशाहीत मतदार हा राजा समजला जातो़ मतदानाचा पवित्र हक्क बजाविण्यासाठी स्वत:चे लग्न असतानाही कुर्डूवाडी येथील जोडप्याने मंगळवारी लग्नापूर्वीमतदान केंद्रात जाऊन, आधी लोकशाहीचे लग्न म्हणत मतदानाचा हक्क बजाविला आणि नंतर स्वत:च्या लग्नासाठी बोहल्यावर चढले़ या निमित्ताने लग्नाआधीच पहिल्यांदा लोकशाहीची वरात निघाली.
माढा लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान घेण्यास सुरूवात झाली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगाच रांगा लावल्या होत्या. अशातच आज विवाह असलेल्या कुर्डूवाडी येथील नागेश संजय गाडेकर व पल्लवी हिने मतदान करण्यासाठी केंद्रात हजेरी लावली.
नागेश याने नववधू पल्लवी हिला मोटारसायकलवर मतदान केंद्रापर्यंत आणले़ दोघांनीही या ठिकाणी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केले. लग्नाआधीच मतदानाचे पवित्र कर्तव्य बजाविणाºया या जोडप्याचे सर्वस्तरातून कौतुक होत होते.