आषाढीत वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; २५ हजार ५०० अधिकारी असणार रात्रंदिवस तैनात
By Appasaheb.patil | Published: June 20, 2024 07:12 PM2024-06-20T19:12:52+5:302024-06-20T19:13:20+5:30
श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात.
सोलापूर : आषाढी वारीच्या काळात राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षेबाबत दक्षता घेण्यासाठी २५ हजार ५०० अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ३४ आपत्ती प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने माध्यमांशी बाेलताना दिली.
आषाढी यात्रा सोहळ्यात वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून आषाढी वारीचे पूर्व नियोजन करण्यात आले आहे. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी २०२४ रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. पालखी सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात. पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याबाबत परिपूर्ण काळजी जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंढपुरात होत असलेल्या आषाढी वारीसंदर्भातील तयारीचा आढावा घेतला आहे.