पत्नीच्या नावाखाली सोलापुरातील सरकारी डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 01:08 PM2020-11-28T13:08:48+5:302020-11-28T13:08:52+5:30
बिनधास्तपणे ओपीडी अन् आंतररुग्ण सेवा : व्यवसायरोध भत्ता घेऊनही खासगी सेवा
सोलापूर : सार्वजनिक आरोग्य विभागासह शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता दिला जातो. तरीही काही डॉक्टर हे खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत आहेत.
शासकीय रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना दर महिन्याला सुमारे दीड लाख रुपये वेतन दिले जाते. तसेच खासगी प्रॅक्टिस करु नये म्हणून वेतनाच्या ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता (एनपीए) दिला जातो. परंतु, काही डॉक्टर हे खासगी रुग्णालयात बिनधास्तपणे ओपीडी, आंतररुग्ण सेवा देत आहेत. काहीजण केवळ शस्त्रक्रियेपुरते जातात. आपले नाव येऊ नये याची काळजी घेतली जाते. मात्र, अशा प्रकारच्या सेवा देतानाचे छायाचित्र, अन्य पुरावा मिळत नसल्याने कारवाईला अडचणी येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
तसेच खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करण्याच्या उद्देशाने काही जण न्यायालयात गेले असल्याचे सांगण्यात आले.
खासगी डॉक्टरांसोबत प्रॅक्टिस
शासकीय रुग्णालयात सेवा करत असताना पुणे रोड परिसरात या डॉक्टरांची प्रॅक्टिस सुरु आहे. दवाखान्यावर पत्नीचे नाव सुरुवातीला लावून खासगी प्रॅक्टिस सुरु आहे. फक्त एकच नव्हे तर तीन ते चार विविध शाखेतील डॉक्टर घेऊन हे शासकीय सेवेतील डॉक्टर उपचार करत आहेत.
मध्यवर्ती भागात रुग्णालय
शहराच्या मध्यवर्ती भागात शासकीय सेवेतील हे डॉक्टर प्रॅक्टिस करत आहेत. सोबतच एक पॅथॉलॉजी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. येथे विविध प्रकारच्या चाचण्या होतात. हॉस्पिटलच्या दर्शनी भागात स्वत:च्या नावासोबत डॉक्टर पत्नीचेही नाव लिहिण्यात आले आहे.
फलकावर झळकते नाव
शासकीय सेवेत कार्यरत असणारे हे डॉक्टर सात रस्ता परिसरात सेवा देत आहेत. पत्नी स्त्रीरोगतज्ज्ञ असून त्यासंबंधी उपचार या खासगी रुग्णालयात सुरु आहेत. शासकीय सेवेत असणारे डॉक्टर हे शस्त्रक्रिया करत असल्याचा फलक या रुग्णालयासमोर लावण्यात आला आहे.
मोठ्या खासगी रुग्णालयातही देतात सेवा
- - पूर्वी काही अटींनुसार शासकीय सेवेतील डॉक्टरांना खासगी सेवा देण्याची मुभा देण्यात आली होती. याचे दुष्परिणाम दिसत असल्याने ही सवलल बंद करण्यात आली. तसेच डॉक्टरांना वेतनाच्या ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता देण्याचा नियम करण्यात आला. जुना नियम असताना आम्ही रुग्णालय सुरु केले. आता नव्या नियमामुळे आमचे रुग्णालय बंद कसे करायचे ? हा प्रश्न घेऊन काही डॉक्टर न्यायालयात गेले. त्यामुळे काही डॉक्टर हे खासगी डॉक्टर सेवा देत आहेत.
- - शहरात असणाऱ्या मोठ्या रुग्णालयात प्रत्यक्ष सेवा देत नसले तरी फक्त शस्त्रक्रियेसाठी जाणारे डॉक्टर आहेत. फोनवरुन कधी जायचे हे ठरवून शस्त्रक्रिया पार पाडली जाते. त्यामुळे कोणत्या डॉक्टराने शस्त्रक्रिया केली हे गुलदस्त्यात ठेवले जाते. शासनाने वेतन देऊनही असे प्रकार घडतात. रुग्णालय चालक व डॉक्टर यांच्या संगनमताने हा प्रकार सुरु असल्याचे रुग्णसेवेशी संबंधित एका तज्ज्ञाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.