खासगी संघाकडून दूध खरेदीदर १७ रुपयांवर आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:38 PM2018-06-15T12:38:41+5:302018-06-15T12:38:41+5:30
खासगी संघांचा निर्णय: दूध विक्रीदरातही केली चार रुपयांची कपात
अरुण बारसकर
सोलापूर : दूध खरेदीचे दर पुन्हा दोन रुपयांनी कमी केल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली असून आता गायीच्या दुधाला प्रति लिटर १७ रुपयांचा दर मिळणार आहे. पावडरचे दर घसरल्याचे कारण असले तरी शेतकºयांनी करायचे काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विक्री दुधाचे दर ४२ वरून ३८ रुपये केल्याचेही सांगण्यात आले.
जून २०१७ पासून शासनाने गायीच्या दुधाला प्रति लिटर २७ रुपयांचा दर देण्याचा आदेश काढला होता. मात्र त्यानुसार दर देण्यास खासगी संघांनी नकार देत उलट असलेला प्रति लिटर २५ रुपयांचा दर कमी केला. शासन आदेशानुसार दर देणे शक्य नसल्याची खासगी संघांनी मागील वर्षी घेतलेली भूमिका आजही कायम असून शासन मात्र यावर ठोस भूमिका घेत नाही. यामुळे मागील वर्षी प्रति लिटर २५ रुपये असलेला दर यावर्षी १७ रुपयांवर आला आहे.
इंदापूर येथील सोनाई डेअरीने तसे ९ जून रोजी दूध पुरवठादार संस्थांसाठी लेखी आदेशच काढले आहेत. ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. असलेल्या दुधाचा दोन रुपयांनी दर कमी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दूध पावडरचा साठा अतिरिक्त झाल्याने पावडरला प्रति किलो ३० रुपयांचे नुकसान तर दुधावर प्रति लिटर ३ रुपयांचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. दूध खरेदीदर प्रति लिटर १९ रुपयांवरून १७ रुपये करण्याचा निर्णय घेत असताना विक्रीचे दरही कमी केले आहेत.
दूध विक्रीचा दर प्रति लिटर ४२ रुपये होता, तो ३८ रुपये करण्याचा निर्णय घेतला असून दूध पिशवीवर एम.आर.पी. ४२ रुपयांऐवजी ३८ रुपये छापण्यात येणार असल्याचे सोनाईचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले.
‘महानंद’ही याच मार्गाने
- शासनाचा महानंदही याच मार्गाने जात असून खासगी संघांनी दूध खरेदीदर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महानंदची बैठक १९ जून रोजी होणार आहे. या बैठकीत दूध खरेदीदर कमी करण्याच्या निर्णयावर चर्चा होणार असल्याचे संचालकांनी सांगितले. परवडत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे संचालक ज्ञानेश्वर पवार यांनी सांगितले.
यापेक्षाही दर कमी करावा लागणार आहे. शासनाला सर्व काही माहिती असूनही बघ्याची भूमिका घेत नाही. दर कमी करण्याचा निर्णय हा सर्व खासगी संघांनी एकत्रितरित्या घेतला आहे.
दशरथ माने
- सोनाई डेअरी, इंदापूर
दूध व्यवसायाबाबत अज्ञानी व अनुभव नसलेले लोक सत्तेत बसले आहेत. त्यांना शेतकºयांचे दु:ख समजत नाही. शेतकºयांसाठी मारक धोरण राबवित असल्याने दूधदर कमी होत आहेत.
- ज्ञानेश्वर पवार,
संचालक, महानंद
१७ रुपयांचे दूध ३८ रुपयांनी विकते
- - शेतकºयांकडून १७ रुपयांनी खरेदी केलेले दूध इंदापूरला पोहोच करण्यासाठी दोन रुपयांचा खर्च असे संस्थांना प्रति लिटर १९ रुपये दिले जाणार आहेत. हे दूध ग्राहकांना प्रति लिटर ३८ रुपयांनी विक्री केले जाणार आहे. आतापर्यंत शेतकºयांकडून १९ रुपये प्रति लिटर खरेदी केलेले दूध ग्राहकांना ४२ रुपयांनी मिळत होते.