प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी प्रियकरास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:19 PM2019-05-18T13:19:42+5:302019-05-18T13:20:46+5:30
सोलापूर जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीशांनी ठोठावली शिक्षा
सोलापूर : मोबाईल सारखा व्यस्त लागत असल्याने चौकशी केली असता, पत्नीबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. जगताप यांनी प्रियकरास जन्मठेप व दहा हजारांचा दंड, आरोपीने दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास शिक्षा सुनावली.
बसवराज उर्फ बसू सिद्धलिंग हत्तरके (वय-३0, रा. समाधाननगर, जुनी मशीदजवळ, सोलापूर) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, मयत अनुप्रिया (वय-३६) ही फिर्यादी जगन्नाथ बाळकृष्ण सामलेटी (रा. सोलापूर) याची दुसरी पत्नी होती. २00८ साली फिर्यादी याचे मयत अनुप्रिया हिच्याबरोबर तुळजापूर येथे दुसरे लग्न झाले होते. मयत अनुप्रिया हिला पहिल्या पतीपासून एक मुलगी असून, ती तिच्याजवळच राहत होती. मयत अनुप्रिया हिची आई गीता सुरेश पोला हीसुध्दा तुळजाभवानीनगर येथे मयत अनुप्रियाच्या घरी राहण्यास येत होती. फिर्यादी जगन्नाथ सामलेटी याची पहिली पत्नी जया ही जुने विडी घरकुल, सोलापूर येथे राहण्यास आहे. तिला दोन मुली व एक मुलगा अशी अपत्ये आहेत. फिर्यादी हा आठवड्यातून चार दिवस पहिली पत्नी जया हिच्याकडे तर दोन दिवस दुसरी पत्नी मयत अनुप्रिया हिच्याकडे राहत असे.
दि. ९ आॅगस्ट २0१८ रोजी फिर्यादी जगन्नाथ हा त्याच्या पहिल्या पत्नीच्या घरी होता. पहाटे ३.४५ वा़च्या सुमारास अनुप्रिया हिची आई गीता पोला यांनी जगन्नाथ सामलेटी याला मोबाईलवर फोन करून अनुप्रिया हिला कोणीतरी चाकूने मारुन जखमी केले आहे, रक्त भरपूर गेले आहे, तुम्ही लवकर या, असे सांगितले. अनुप्रिया हिच्या शेजारी राहणारे प्रभाकर गंपले व शिंपी यांनीही फोन करून माहिती दिली. जगन्नाथ याने तत्काळ अनुप्रिया हिचे घर गाठले. अनुप्रिया ही जखमी अवस्थेत पडली होती, शेजारी एक चाकू पडलेला होता. जगन्नाथ याने असलेल्या लोकांच्या मदतीने अनुप्रियाला सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास होऊन बसवराज हत्तरके याच्या विरोधात भादंविसंक ३0७ व ३0२ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.
खटल्यात साक्षीदाराची साक्ष, मयताची मुलगी, डॉक्टर, घराशेजारी राहणारे साक्षीदार, रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल, पंचाच्या साक्षी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी बसवराज उर्फ बसू सिध्दलिंग हत्तरके याला न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड़ प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीतर्फे अॅड़ बायस यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संपत पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण यांनी मदत केली.