पटसंख्या कमी असलेल्या सोलापूर शहरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:06 PM2017-12-05T12:06:29+5:302017-12-05T12:08:08+5:30
पटसंख्या कमी असलेल्या सोलापुरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांनी लोकमतशी बोलताना दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : पटसंख्या कमी असलेल्या सोलापुरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना दिली.
गुणवत्ता असलेल्या शाळांमध्ये पट वाढत आहे तर दुसरीकडे कमी गुणवत्तेच्या शाळेतील पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सामाजीकरण होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व महाराष्ट्र बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षण हक्क नियम २०११ मधील तरतुदीचे उल्लंघन न करता या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजन करून त्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील २१ शाळा असून, मनपा हद्दीतील पाच शाळांचा त्यात समावेश होत आहे. अशाप्रकारे समायोजन करण्याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी ३० नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे काम सुरू झाले आहे. सोलापुरातील पुढील खासगी शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येत आहे. महात्मा बसवेश्वर प्री. प्रायमरी स्कूल (पटसंख्या: ९, शिक्षक: ६), समायोजन सह्याद्री प्रशाला, दमाणीनगर, विद्या विकास प्राथमिक शाळा व बालक मंदिर (पटसंख्या: ९, शिक्षक: १), समायोजन: लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळा, चेतना मराठी विद्यालय (पट: ६, शिक्षक: २), समायोजन: अण्णासाहेब पाटील प्रशाला, रामवाडी, वडार समाज प्रायमरी (पट: ७, शिक्षक: २), समायोजन: दमाणी विद्या मंदिर, जैन गुरुकुल प्रशाला, ज्ञानोदय विद्यालय (पट: ८, शिक्षक: ३) समायोजन: कुचन प्रशाला, रविवार पेठ. संबंधित शाळेत बंद करण्यात आलेल्या शिक्षकांची पदस्थापना पुढील समायोजन प्रक्रिया होईपर्यंत व विद्यार्थ्यांचे ज्या शाळेत समायोजन केले आहे, त्याच शाळेत करण्यात येईल.
-----------------
मनपा शाळेला मिळतील शिक्षक
संबंधित शिक्षकांचे वेतन त्याच शाळेतून निघणार आहे. पण या शिक्षकांचे समायोजन करताना संबंधित शाळेत मंजूर पदानुसार रिक्त पद असेल तरच समायोजन होणार आहे. अन्यथा मनपातील रिक्त पदावर प्राधान्यक्रमानुसार संबंधित शिक्षकास तात्पुरते समायोजित करण्याचे शिक्षणाधिकाºयांनी सूचित केले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासन अधिकारी साळुंके यांनी दिली.