आठ वर्षांनंतर ग्रामीण रुग्णालयात ट्राॅमा केअर सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:55+5:302021-06-11T04:15:55+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात आठ वर्षांपूर्वी २०१२ मध्ये ट्राॅमा केअर सेंटर सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून अध्यादेश निघाला होता. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ...
येथील ग्रामीण रुग्णालयात आठ वर्षांपूर्वी २०१२ मध्ये ट्राॅमा केअर सेंटर सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून अध्यादेश निघाला होता. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता बांधकाम व विद्युतीकरणासाठी ४ कोटी ७७ लाख ९७ हजार ९५७ रुपयांची ई-टेंडर निविदा निघाली आहे. कुर्डूवाडीकरांतून आनंद व्यक्त होत आहे. तत्कालीन आ. नारायण पाटील यांच्या कार्यकाळात हे केअर सेंटर मंजूर झाले, मात्र त्याची निविदा विद्यमान आ. संजयमामा यांच्या कार्यकाळात निघाली. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी या कामाच्या श्रेयवादासाठी सोशल मीडियावरून धडपड चालवली आहे.
याबाबत राज्य सरकारकडील अध्यादेश निघाल्यानंतर शहरात मोठे ट्राॅमा केअर सेंटर उभे करावे म्हणून राज्य शासनाकडे अभियंता विजयसिंह परबत, डॉ. विलास मेहता, डॉ. शशिकांत त्रिंबके यांनी २७ जून २०१६ रोजी याबाबत लेखी प्रस्ताव व निवेदन दिले. तोपर्यंत राज्य सरकारने काढलेला ट्राॅमा केअर सेंटरबाबतचा अध्यादेश तेथेच धूळ खात पडून होता. त्यानंतर ३ जुलै रोजी संबंधित ट्राॅमा केअरचे अंदाजपत्रक मान्यतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत मुख्य अभियंत्याकडे पाठवले. परंतु त्रुटी असल्याने तो प्रस्ताव पुन्हा बांधकाम विभागाला पाठविण्यात आला.
दरम्यान, एका वर्षानंतर करमाळ्याचे तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी २०१८ च्या डिसेंबरमध्ये तत्कालीन आरोग्यमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करून हे ट्राॅमा केअर सेंटर कुर्डूवाडीत आणले. त्या वेळी २६ जून २०१९ रोजी ट्राॅमा केअरच्या इमारतीसाठी ३ कोटी ६५ लाख ७० हजार ६०० रुपये व विद्युतीकरणासाठी ६३ लाख २२ हजार २०० रुपये अशी तरतूद असलेला नवा अध्यादेशही काढण्यात आला. परंतु दरसूची बदलल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचा फेरप्रस्ताव तयार केला.
----
कुर्डूवाडीकरांमध्ये आनंद
दरम्यानच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने पुन्हा प्रस्ताव रखडला. त्यानंतर मात्र करमाळा विधानसभा निवडणुकीत बाजी मारलेले विद्यमान आ. संजयमामा शिंदे यांनी याकडे पहिल्यांदा लक्ष देत ४ कोटी ७७ लाख ९७ हजार ९५७ रुपयांचा वाढीव प्रस्ताव सरकारकडून मंजूर करून घेतला व त्याची निविदा प्रक्रिया नुकतीच झाल्याने शहरात आनंद व्यक्त होत आहे.
----