१७ लाख रुपये खर्चून उभारलेल्या प्रकल्पातून कंपोस्ट खत निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:25 AM2021-09-22T04:25:54+5:302021-09-22T04:25:54+5:30
सांगोला नगरपरिषदेच्या वतीने कडलास रोडवरील कचरा डेपोमध्ये गेल्या ३० वर्षांपासून कचरा साठून राहिलेला होता. येथील कचरा विघटन करण्यासाठी ...
सांगोला नगरपरिषदेच्या वतीने कडलास रोडवरील कचरा डेपोमध्ये गेल्या ३० वर्षांपासून कचरा साठून राहिलेला होता. येथील कचरा विघटन करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत सुमारे १७ लाख ६८ हजार ९१४ खर्चून घनकचरा प्रकल्पासाठी अद्ययावत मशिनरीची उभारणी केली आहे. या मशिनरीद्वारे कचरा विघटन करण्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा राणी माने यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे , बांधकाम समिती सभापती अप्सराताई ठोकळे, आरोग्य समिती सभापती रफिक तांबोळी, नगरसेवक सचिन लोखंडे, नगरसेविका छाया मेटकरी, आरोग्य निरीक्षक विनोद सर्वगोड, पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने, स्वच्छ सर्वेक्षण शहर समन्वयक शिवाजी सांगळे, आनंद घोंगडे आदी उपस्थित होते.
या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये एकूण १३९७५ घनमीटर कचऱ्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये ४२०० घनमीटर इतक्या कचऱ्यावरती विघटनाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामधून विघटन झालेल्या कचऱ्यावरती प्रक्रियाद्वारे तयार झालेले कंपोस्ट खत शेतकरी व व्यापाऱ्यांना विकला जातो. तसेच यामधील काच व प्लास्टिकला वेगळे करून वस्तूंच्या पुनर्वापरासाठी विकले जाते. यामध्ये उर्वरित जुन्या कचऱ्याच्या विघटनासाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन त्यावरही लवकरच प्रक्रिया केली जाणार असल्याचे नगराध्यक्षा राणी माने यांनी सांगितले.
............
फोटो ओळ - सांगोला नगरपरिषदेच्या वतीने घनकचरा विघटनासठी घेतलेल्या नवीन मशिनरीचे पूजन करताना नगराध्यक्ष राणी माने, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, अप्सराताई ठोकळे, रफिक तांबोळी, सचिन लोखंडे, छाया मेटकरी आदी.
.....
फोटो २१सांगोला