कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून दररोज साडेसात हजार अंड्याचे उत्पादन, कुरूलच्या शेतकऱ्याची जिद्द!
By Appasaheb.patil | Published: March 28, 2023 01:41 PM2023-03-28T13:41:30+5:302023-03-28T13:41:37+5:30
कुक्कटपालनाच्या मिळणाऱ्या नफ्यातून कांबळे यांनी स्वतःची फीड मिल सुरू केली. त्यासाठी लागणारा कच्चा माल (मका व सोयाबीन) हा स्थानिक स्तरावरुन प्राप्त केला.
सोलापूर : खरं तर शेती व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे केवळ शेती व्यवसायावर अवलंबून न राहता जोडव्यवसाय करणे काळाची गरज ठरते. मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील हणमंत धोंडिबा कांबळे यांनी हे जाणले, शेतीला कुक्कुट पालनाची जोड दिली आणि स्वतःची प्रगती केली. एवढेच नव्हे तर कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून दररोज साडेसात हजार अंड्याचे उत्पादन घेणाऱ्या कांबळे यांनी स्वत: मुलाला पोलिस उपनिरीक्षकही बनवलं.
पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणे या योजनेचा पंचायत समिती मोहोळ येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लाभ घेतला आहे. हणमंत कांबळे यांनी त्यांच्या व्यवसायाच्या आजवरच्या प्रवासाची माहिती दिली. ते म्हणाले की, उपजीविकेसाठी पूर्णपणे शेतीवर अवलंबून होतो. मला पशु संवर्धन विभागाकडून कुक्कुट पालनाविषयी माहिती, मार्गदर्शन मिळाले.
मी स्वक्षमतेने कुक्कुट पक्षांसह संगोपन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर अनुदानासाठी अर्ज केले, अनुदान मिळाले. माझ्याकडे ब्रीडर स्टॉक हे सी.पी.डी.ओ. बंगळूरू कडून प्राप्त असून सध्या १० हजार कावेरी जातीचे पक्षी आहेत. दीड लाख क्षमतेचे सेटर मशीन आहे. ३० हजार क्षमतेचे हॅचर आहे. साडेसात हजार दैनंदिन अंडी उत्पादन आहे.
नफ्यातून सुरू केली फीड मिल..
कुक्कटपालनाच्या मिळणाऱ्या नफ्यातून कांबळे यांनी स्वतःची फीड मिल सुरू केली. त्यासाठी लागणारा कच्चा माल (मका व सोयाबीन) हा स्थानिक स्तरावरुन प्राप्त केला. या व्यवसायातून माझी आर्थिक उन्नती झाली.
राज्याचे अधिकारी सोलापुरात..
हणमंत कांबळे यांच्या शेडला भेट देऊन त्यांनी ही योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन डॉ. संतोष पंचपोर यांनी कांबळे यांचे कौतुक केले आहे. एकूणच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.