शहरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, ४ डिसेंबरपर्यंत अंमल, सभा आंदोलनास मनाई
By विलास जळकोटकर | Published: November 20, 2023 06:22 PM2023-11-20T18:22:14+5:302023-11-20T18:22:41+5:30
शहर पोलीस प्रशासनाने बजावले आदेश
विलास जळकोटकर, सोलापूर: दीपावली पार पडलेली असलीतरी अद्यापही आगामी काळात धार्मिक उत्सव, सणांचा काळ असल्याने या कालावधीमध्ये शहर परिसरात अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सोमवारपासून (दि. २०) येत्या ४ डिसेंबरपर्यंत सभा, मोर्चे, आंदोलने करण्यास मनाई करण्याचा जमावबंदीचा आदेश काढला आहे.
पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांच्या सहीनिशी या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या सर्वत्र सभा, मोर्चे, आरक्षण मागणी अशा विविध घटनांनी समाजातील वातावरण ढवळून निघत आहे. त्यातच आगामी काळात अनेक सण व धार्मिक उत्सव संपन्न होणार असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अथवा त्यात बाधा आणण्याचे प्रकार घडण्याची दाट शक्यता असल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.
या आदेशानुसार शहर पोलिस प्रशासनातर्फे महाराष्ट्र पोलिस प्रशासन अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व ३७ (३) नुसार शहर व परिसरात ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणे, दगड अथवा शस्त्रसाठा करणे, व्यक्ती अथवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी जोरजोरात गाणी म्हणणे, असभ्य हावभाव करत धार्मिक भावना दुखावणे अशा बाबींसाठी मनाई करण्यात आली आहे.
एकत्र येण्यास बंदी
याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी सभा घेणे, मोर्चे काढणे, निदर्शने करणे, विरोधदर्शक आंदोलने करणे यासह पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यांनी पास काढले आहेत अथवा परवानगी काढली आहे अशांना हा आदेश लागू होणार नाही. हा मनाई आदेश ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.