कोरोनाचा प्रसार; सोलापूर महापालिकेत अनेक कर्मचाऱ्यांचा मास्कविना वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 02:33 PM2021-03-03T14:33:41+5:302021-03-03T14:34:07+5:30
कधी हाेणार कारवाई : इंद्रभुवन आवारात सायंकाळी असते गर्दीच गर्दी
साेलापूर : कामाच्या ठिकाणी मास्क वापरा, फिजीकल डिस्टन्सिंग पाळा असे आदेश देणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या मुख्यालयात अनेक कर्मचारी दाटीवाटीत काम करीत असल्याचे दिसून आले. अनेक कर्मचारी आणि नागरिक मास्क न लावताच फिरत हाेते.
काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिकेचे कर्मचारी मंगल कार्यालये, बाजारपेठेत जाऊन मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत आहेत. आजवर १० लाखाहून अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे. लाेकमतच्या प्रतिनिधींनी मंगळवारी पालिकेत फेरफटका मारला. कामाच्या ठिकाणी मास्क घालून काम करणे शक्य नसतेच, परंतु एका विभागातून दुसऱ्या विभागात फिरणारे कर्मचारी विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले. नगररचना कार्यालयात दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमाराला गर्दी हाेती. हातात फाईल घेऊन फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मास्क नव्हता. कामासाठी आलेले नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करुन थांबले हाेते. त्यांना हटकण्यााचे धाडस काेणीही दाखवत नव्हते. हीच अवस्था बांधकाम विभागात हाेती.
सार्वजनिक आराेग्य अभियंता कार्यालयात अनेक ज्येष्ठ कर्मचारी आहेत. या कार्यालयातील दाेन ज्येष्ठ महिला कर्मचाऱ्यांकडे मास्कच नव्हता. नागरिकांची गर्दीही हाेती. प्लास्टिक विराेधी कारवाई करणारा विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागातील अनेक कर्मचाऱ्यांकडे मास्क नसल्याचे आढळून आले.
१० लाखहून अधिकचा दंड वसूल
अडीच हजारहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई
३० कर्मचारी विनामास्क
पालिकेच्या विविध खात्यांमधील कर्मचारी विनामास्क फिरत असल्याचे दिसून येते. जन्म दाखला, कर भरण्याच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येते. नगररचना आणि बांधकाम कार्यालयात सायंकाळी तुफान गर्दी असते. इंद्रभुवन आवारात सायंकाळी बाजार भरलेला असताे. अनेक नागरिक, कर्मचारी आवारात थुंकतात. विनामास्क फिरत असतात.
पालिकेचा आवार असाे इतर सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क घालणे आवश्यकच आहे. त्याशिवाय काेराेनाला राेखता येणार नाही. महापालिकेत नुकतेच गुटखा, तंबाखू खाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली हाेती. मास्क न वापरता फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल.
- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.