बार्शीच्या अभय चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘चरणदास चोर’ चित्रपटाचा प्रोमो बार्शीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:00 PM2017-12-20T13:00:13+5:302017-12-20T13:04:44+5:30
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करा. उत्तम लेखकांची तसेच अभिनय असलेल्या कलाकारांची फिल्म इंडस्ट्रीला मोठी गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक श्याम माहेश्वरी यांनी केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
बार्शी दि २० : मी फिल्म बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हीरो शोधण्यासाठी मुंबईच्या बाहेर जावे लागेल, असे वाटले नव्हते. परंतु शोध घेतल्यानंतर ज्या बार्शीबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हती त्या ठिकाणाहून आम्हाला आमच्या चित्रपटाचा हीरो मिळाला. नवोदित सिनेअभिनेता अभय चव्हाण त्याचे उत्तम उदाहरण आहे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करा. उत्तम लेखकांची तसेच अभिनय असलेल्या कलाकारांची फिल्म इंडस्ट्रीला मोठी गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक श्याम माहेश्वरी यांनी केले.
‘चरणदास चोर’ या मराठी चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत बार्शीचा नवोदित युवा सिनेअभिनेता अभय चव्हाण आहे. येत्या २९ डिसेंबर रोजी राज्यातील सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर बार्शीतील संत तुकाराम सभागृहात प्रोमोचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी चित्रपटाच्या निर्मात्या दीपा माहेश्वरी, शिवाजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, सचिव जयकुमार शितोळे, डॉ. संजय अंधारे, प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात, प्राचार्य एस. के. पाटील, तुकाराम गव्हाणे, डॉ. लक्ष्मीकांत काबरा, अजित कुंकूलोळ, अभिनेता अभय चव्हाण, नायिका सोनम पवार, बालकलाकार आदेश आवारे, वडील मुरलीधर चव्हाण, अभयची आई प्रतिभा चव्हाण, आजी कांतिका चव्हाण व कुटुंबीय उपस्थित होते. अतिशय जल्लोषी वातावरणात बार्शीकरांनी त्याला प्रोत्साहित केले. अभयचे शिवाजी संस्थेच्या प्रांगणात आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात त्याला खांद्यावर घेऊन कॉलेजच्या युवक-युवतींनी मिरवणूक काढली़
दिग्दर्शक श्याम माहेश्वरी म्हणाले, या चित्रपटाला साजेसा हीरो मुंबईत मिळणार नाही म्हणून फेसबुकवरून शोध सुरू केला. खूप प्रयत्नानंतर बार्शीचा अभय नजरेस पडला. त्याने फेसबुकवर प्रतिसाद दिला नाही म्हणून त्याला मित्रांकडून आॅडिशनसाठी तयार केले. तो चांगला कलाकार आहे. त्याला संधी दिलीय, आता स्टार करण्याची जबाबदारी तुमची आहे, अशी भावनिक साद घातली.
अॅक्टर बनणे हे खूप अवघड काम आहे़ त्यासाठी मुंबईत रोज हजारो जण येतात. मात्र बार्शीकर लकी आहेत की, ज्या ठिकाणाहून आम्हाला हा गुणी कलाकार मिळाला़
चित्रपटासाठी फेसबुकवर आॅफर आल्यानंतर दिग्दर्शकालाच कसे ब्लॉक केले होते, याची गंमतशीर कथा ऐकवत सिनेअभिनेता अभय चव्हाण म्हणाला, युवा महोत्सवामध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली. मी अभिनेता व्हायचे स्वप्न पाहिले होते. ते या निमित्ताने पूर्णत्वाला जात आहे.
बबन हा दुसरा चित्रपटही लवकरच येत आहे. बार्शीतील ज्या सिनेमागृहात आजोबा स्व. भगवान चव्हाण यांनी काम केले त्याच सिनेमागृहात नातवाचा चित्रपट येत्या २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे, ही माझ्यासाठी व कुटुंबीयांसाठी खूप भावनिक व अभिमानाची बाब आहे. महाविद्यालयीन जीवनात प्राचार्य स्व. मधुकर फरताडे तसेच दिग्दर्शक अमर देवकर व प्रा. मधुकर डोईफोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.
अभिनेत्री सोनम पवार म्हणाली, अभय हा खूप भारी माणूस आहे. त्याने चित्रपटातही भारीच काम केले आहे़ त्याच्या कलेसाठी हॅट्स आॅफ़
-----------------
सामाजिक कामाचेच फळ- चव्हाण
- अभयचे वडील मुरलीधर चव्हाण हे पिग्मी गोळा करण्याचे काम करायचे. आता ते शिवशक्ती बँकेचे संचालक आहेत. शिवाय सामाजिक काम करणाºया मातृभूमी प्रतिष्ठानचे सहसचिव आहेत. आपण करीत असलेल्या सामाजिक कामांच्या आशीर्वादानेच माझ्या मुलाला एवढी मोठी संधी मिळाली असल्याची भावना मुरलीधर चव्हाण यांनी व्यक्त केली़