पंधरा वर्षांनंतर मिळाली पदोन्नती; सोलापुरातील दिव्यांग शिक्षकांनी वाटले पेढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 PM2021-09-21T16:11:24+5:302021-09-21T16:11:30+5:30
दिव्यांग शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित होता.
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दिव्यांग शिक्षकांना १५ वर्षांनंतर मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाल्याने सोमवारी जिल्हा परिषदेत पेढे वाटण्यात आले.
दिव्यांग शिक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष थोरप्पा चव्हाण, देविदास चौधरी, सुरेश चव्हाण, शिवलिंग नकाते, भीमराव मगर, चंद्रकांत पवार, विजय पाटील, अनिल काळे, शशिकांत शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली व शिक्षकांना न्याय दिल्याबद्दल आभार मानले. त्यावेळी सीईओ स्वामी यांनी पदोन्नती प्रक्रियेचे मानकरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील व प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड असल्याचे सांगितले. त्यानंतर या शिक्षकांनी जिल्हा परिषदेते पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात ऑनलाइन समुपदेशनाद्वारे दिव्यांगांना प्राधान्य देत अस्थिव्यंग : ४७, कर्णबधिर : ५, अल्पदृष्टी : ४ अशा ५६ शिक्षकांना पदोन्नती दिली. दिव्यांग शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित होता. संघटनेच्या दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सीईओ स्वामी यांनी प्राधान्याने हा विषय हाती घेतल्याबद्दल शिक्षक देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.