हातगाड्यांवरून केला प्रचार; निवडून आले सदस्य पाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:23 AM2021-01-23T04:23:00+5:302021-01-23T04:23:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्याचेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खांडवी ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही राजकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्याचेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खांडवी ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही राजकीय पाठिंबा नसताना केवळ आणि केवळ सामाजिक कार्य आणि विकासाच्या मुद्द्यावर आकाश दळवी व त्याच्या मित्रपरिवाराने हातगाड्यांवर प्रचार करून आपले पाच सदस्य निवडून आणले. समोर बलाढ्य उमेदवार असतानाही त्यांनी कडवी झुंज दिली. या निवडणुकीत तरुणाई विरुद्ध राजकीय आणि बलाढ्य उमेदवार उभे राहिल्याने निवडणूक अटीतटीची झाली. त्याचबरोबर प्रचार करतानाही लोक सोबत यायचे नाहीत. परंतु, या युवकांनी कल्पकतेच्या जोरावर वायू प्रदूषण आणि खर्च टाळण्यासाठी हातगाडीवर स्पीकर लावून प्रचार केला.
यावेळी प्रचार करताना ‘नावासाठी नाही, तर गावाच्या विकासासाठी मत द्या, भ्रष्टाचार संपविण्यासाठी मत द्या’ अशा मुद्द्यांवर या युवकांनी प्रचार केला. गावातील मतदारांनीही या युवकांना पसंती देत आकाश दळवी याच्या पॅनेलचे नऊपैकी पाच उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून दिले. त्यात आकाश पांडुरंग दळवी (वय २३), सचिन कुंडलिक चोरघडे (२४), योगिराज कल्याण सातपुते (२५), सुवर्णा वाघमारे (३५) व मीना विनोद गपाट हे पाच उमेदवार निवडून आले आहेत.
या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर आम्हाला गावकऱ्यांनी जो आशीर्वाद दिला आहे, तो आम्ही सार्थकी लावून गावाचा विकास करू. हेच एकमेव उद्दिष्ट आम्ही सर्वजण साध्य करणार असल्याचे स्पष्ट करून मतदारांचे आभार मानले. सर्व विजयी उमेदवारांसह प्रवीणकुमार घोडके, ज्ञानेश्वर ठाकरे यांचा बार्शीत सहजीवन परिवाराचे मार्गदर्शक, माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर, अध्यक्ष बालाजी डोईफोडे, ॲड. सुहास कांबळे, संतोष कळमकर, सुमीत नवले, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्ष ॲड. सुप्रिया गुंड यांनी सत्कार केला.
यावेळी ॲड. राजशेखर गुंड, सोमनाथ सेवकर, अनिल जाधव, अंकुश कंगले, विनोद गपाट, नानासाहेब गव्हाणे मेजर, सचिन मस्तूद आदी मान्यवर उपस्थित होते. गावातदेखील सर्व उमेदवारांचे स्वागत करून जल्लोष साजरा करण्यात आला.
फोटो ओळी : खांडवीत निवडणुकीवेळी आकाश दळवी याच्या आघाडीने हातगाड्यांवर वायू प्रदूषणमुक्त प्रचार करून उमेदवारांना निवडून आणले.