सोलापूर जिल्ह्यातील १२ शिक्षकांची पदे रद्दचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:42 PM2018-11-29T12:42:05+5:302018-11-29T12:43:45+5:30
संस्थाचालकांना दणका : अवर सचिवांची शाळांवर कारवाई
सोलापूर : शिक्षण विभागाच्या अवर सचिव वंदना कृष्णा यांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाºया शिक्षण संस्थाचालकांना या आदेशाने चांगलाच दणका बसला आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील सात शाळांमधील १२ शिक्षकपदे रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाºयांनी शिक्षण संचालकांना पाठविला आहे. माध्यमिकच्या शिक्षणाधिकाºयांनी अनेक वेळा सांगूनही त्या सात शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेतल्याने पदे रद्दचा प्रस्ताव माध्यमिकच्या शिक्षण संचालकांना पाठविला आहे.
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात जवळपास ३२ शिक्षक अतिरिक्त झाले होते. त्या शिक्षकांना ज्या शाळेमध्ये रिक्त पदे आहेत त्या शाळेत समायोजन करून घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक संस्थांनी आपल्याकडे असलेल्या रिक्त पदांचा अहवालच शिक्षणाधिकाºयांना दिला नाही. अनेक संस्थांनी त्यांच्याकडे रिक्त असलेल्या पदांची माहिती लपवून ठेवली. मात्र, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रिक्त पदे असलेल्या शाळांवर अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशनाने समायोजन करण्यात आले होते. मात्र, त्या शिक्षकांना संबंधित संस्थांनी हजर करून न घेतल्याने सात शाळांमधील १२ पदे रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाºयांनी पाठविला आहे.
या शाळेतील शिक्षकांचा समावेश
- या १२ पदांमध्ये पहिली ते पाचवीसाठीची पाच तर सहावी ते आठवीसाठीच्या सात पदांचा समावेश आहे. भारत हायस्कूल, जेऊर (ता. करमाळा) या शाळेतील दोन, श्री विठ्ठल प्रशाला, वेणूनगर (ता. पंढरपूर) येथील एक, सुलाखे हायस्कूल, बार्शी येथील तीन, नूतन विद्यालय, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील एक, जनता विद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा) येथील एक, विद्यामंदिर कन्या प्रशाला, वैराग (ता. बार्शी) येथील दोन, विद्यामंदिर हायस्कूल, वैराग (ता. बार्शी) येथील एक तर अंबिका विद्यामंदिर, शिरापूर (ता. मोहोळ) येथील एक अशी एकूण १२ पदे रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव माध्यमिकच्या शिक्षणाधिकाºयांनी शिक्षण संचालकांकडे पाठविला आहे.
अतिरिक्त शिक्षकांना शाळांनी हजर करून घ्यावे. शिक्षकांनीही शाळेत जाऊन रुजू व्हावे. शाळांनी हजर करून न घेतल्यास पदे रद्द केली जातील. शिक्षक रुजू न झाल्यास शासन निर्णयान्वये कार्यवाही केली जाईल. २०१७-१८ मधील अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्याबाबत काही आक्षेप असल्यास संपर्क साधावा.
- रमेश जोशी,
शिक्षणाधिकारी, माध्यमिक.