धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसाठी श्राद्ध घालून राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध
By दिपक दुपारगुडे | Published: April 27, 2023 06:31 PM2023-04-27T18:31:44+5:302023-04-27T18:32:14+5:30
महूद येथील कासाळ ओढा : पुलावर मध्यभागी पडले जीवघेणे खड्डे
दीपक दुपारगुडे, सोलापूर : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं कसं ओके’मध्ये आहे. या डायलॉगने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले सांगोल्याचे लोकप्रतिनिधी यांच्या होम पिचवर मात्र ‘नाॅट ओके हाय’. महूद-अकलूज रस्त्यावरील कासाळ ओढ्यावरील पुलावर मध्यभागी जीवघेणी खड्डे पडून अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संतप्त तरुणांनी पुलाच्या ठिकाणी चक्क श्राद्ध घालून राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध व्यक्त केला.
जत-सांगोला-अकलूज ते इंदापूर मार्गे पुण्याला जोडणारा हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ९६५ वरील महूद- अकलूज या मार्गावरील कासाळ ओढ्यावरील पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. या पुलाच्या बांधकामाच्या स्लॅबला तडे गेले आहेत. कोठेही संरक्षक कठडे नाहीत. त्यातील अँगल, सळई उघड्या पडल्याने हा पूल कोणत्याही क्षणी ढासळण्याच्या मार्गावर आहे. पुलाच्या दुरवस्थेमुळे पुलावरून थेट खोल ओढ्यात वाहने पडून अनेक अपघात झाले आहेत.
या धोकादायक पुलावरून रात्रंदिवस प्रवासी वाहतुकीसह जड वाहतूक सुरू असते. या धोकादायक पुलाच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावातील तरुणांनी चक्क पुलाखाली ओढ्यात बसून पुरोहिताकडून श्राद्ध घातले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक नेते कैलास खबाले, काकासाहेब नागणे, हनुमंत येडगे, नैनेश कांबळे, अजय चव्हाण, नागेश कांबळे, विवेक देशपांडे, मयूर बाजारे, भैया माने आदी उपस्थित होते.
अद्यापही दुरवस्था संपली नाही...
सांगोला-महूद-अकलूज महामार्गाच्या दुरुस्तीसाठी वारंवार आंदोलने करावी लागत आहेत. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही या मार्गाची दुरवस्था संपलेली नाही. त्यातच महूद येथील कासाळ ओढ्यावरील हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने तो कधीही कोसळून दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे नव्याने पूल उभा करण्याची गरज आहे, असे कैलास खबाले यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"