जालन्यातील लाठीमाराचे पडसाद; माढा येथे टायर जाळून निषेध
By रवींद्र देशमुख | Published: September 2, 2023 07:00 PM2023-09-02T19:00:41+5:302023-09-02T19:01:07+5:30
शनिवारी सकाळी माढा शहरासह परिसरात मराठा समाजातील नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर/माढा : सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जालना जिल्ह्यातील लाठी हल्ल्याचा निषेध टायर जाळून करण्यात आला. तसेच सकाळच्या सत्रात बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून तत्काळ निलंबित करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी सरकारचा निषेध करीत सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाची धग ग्रामीण भागातदेखील पोहोचली असून, दारफळ येथेदेखील कडकडीत बंद पाळण्यात आला. शनिवारी सकाळी माढा शहरासह परिसरात मराठा समाजातील नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून शासनाविरोधात घोषणा देत या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून मराठ्यांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी मराठा सेवा संघाचे दिनेश जगदाळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मुन्ना साठे, राष्ट्रवादीचे शहाजी चवरे, शंभू साठे, भाजपचे मदन मुंगळे, दत्ताजी शिंदे, राजू साठे, रानबा कदम, दादाराव भांगे, मुजीब तांबोळी, अशपाक मोमीन आदींनी मनोगत व्यक्त केले.