जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन आंदोलन; घरकुल व गायरान जमिनी बाबत चौकशी करण्याची मागणी
By शीतलकुमार कांबळे | Published: April 25, 2023 05:08 PM2023-04-25T17:08:21+5:302023-04-25T17:12:29+5:30
या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन घोषणा दिल्या
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन केले. घरकुल योजना व गायरान जमिनीसंदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी. अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन घोषणा दिल्या.
मंगळवार 25 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू होते. दुपारी अडीच वाजता अचानक टेरेसवरून घोषणा दिल्याचा आवाज नागरिक व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आला. इमारतीवर पाहिल्यानंतर त्यांना काही आंदोलक घोषणा देत असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्वरित पोलिसांना पोलिसांची संपर्क साधण्यात आला. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना खाली येण्यास सांगितले. त्यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी 11 एप्रिल रोजी आपण जिल्हा परिषद प्रशासनाला चौकशी करण्यासाठी निवेदन दिले होते.मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. जर त्यांनी वेळी दखल घेतली असतील तर आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडली नसल्याची आंदोलकांनी सांगितले. आम्ही आतंकवादी नाही तर गांधीगिरीने आंदोलन करत आहोत असे आंदोलकांचे म्हणणे होते. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ओढत इमारतीच्या खाली नेत ताब्यात घेतले.