कृष्णा धोत्रे मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यासमोर धरणे
By काशिनाथ वाघमारे | Published: July 31, 2023 04:23 PM2023-07-31T16:23:11+5:302023-07-31T16:23:20+5:30
पंढरपूर : सीआयडी चौकशी करण्याची मागणी
सोलापूर : कृष्णा धोत्रे या बालकाच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेतर्फे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यासमोर सोमवार, ३१ जुलै रोजी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
संत पेठ परिसरात राहाणा-या कृष्णा तिम्मा धोत्रे (वय ७) या बालकाची ६ महिन्यांपूर्वी हत्या झाली. सहा महिन्यानंतरही पोलिसांना या हत्याप्रकरणात गुन्हेगार सापडत नाहीत. याची सीआयडी चौकशी करून तपास करावा. हा प्रकार नरबळीचा असून पोलिसांकडून अद्यापही आरोपींना अटक होत नाही. धोत्रे कुटुंबीयांचे म्हणणे व त्यांना विश्वासात न घेता, पोलिस आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार धोत्रे, रामा धोत्रे, सचिन बंदपट्टे, महेश पवार, महावीर वजाळे, राधा धोत्रे, लक्ष्मी धोत्रे, निता बंदपट्टे, रेश्मा धोत्रे यांच्यासह वडार समाजातील युवक उपस्थित होते.