विनाअनुदनित शाळांवरील शिक्षकांच्या मागण्यांसाठी १० ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन
By Appasaheb.patil | Published: September 22, 2022 12:49 PM2022-09-22T12:49:22+5:302022-09-22T12:49:49+5:30
सरकारविरोधात रोष; न्याय मागण्यासाठी शिक्षक उतरणार रस्त्यावर
सोलापूर : विनाअनुदानित शाळांवरील हजारो शिक्षकांच्या संसाराची राख रांगोळी गेल्या वीस वर्षांत झाली आहे. मंत्रालय स्तरावर ३९६१ शिक्षक अनुदानास पात्र आहेत, त्रुटीपात्र शाळांचा शासन निर्णय तयार आहे. प्रचलित सूत्राची फाईल तयार आहे. या मागण्या मान्य झाल्यास शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल. शिंदे सरकारने शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा १० ऑक्टोबर २०२२ २०२२ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन करण्याचा इशारा पुणे विभाग कार्याध्यक्ष सरफराज बलोलखान यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक/ कमवी शिक्षक शिक्षकेतर संघटना आयोजित शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक संवाद मेळावा इंदिरानगर विजापूर नाका सोलापूर येथील मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे झाला. या मेळाव्याप्रसंगी बलोलखान बोलत होते. या मेळाव्याला पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेचे राज्य अध्यक्ष दीपक कुलकर्णी, राज्य कार्याध्यक्ष संतोष वाघ, राज्य सदस्य अनिल परदेशी, उपाध्यक्ष राहुल कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रमुख के. पी. पाटील, नेहाताई गवळी, सुजाता खट्टे, ज्ञानेश्वर शेळके, प्रा. देविदास जगताप, प्रा. मारुती खरात, प्रा. अमर उमाटे, अनिलकुमार धायगुडे, पुणे विभाग अध्यक्ष प्रा. गणेश फलके, आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
---------
मेळाव्यात ठराव; १० ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन
या मेळाव्यास सुमारे शेकडो शिक्षक उपस्थित होते. या मेळाव्यासाठी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व पुणे या पाचही जिल्ह्यांतील प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक घोषित, अघोषित २० टक्के, ४० टक्के, त्रुटी पात्र या सर्व स्तरावरील शिक्षक हजर होते. याचवेळी पुणे विभागाचे सचिव गंगाधर पडणुरे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी १० ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
------------