अक्कलकोट-सोलापूर सीमेवर आठ ठिकाणी अडविले आंदोलकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:14 AM2021-07-05T04:14:59+5:302021-07-05T04:14:59+5:30
अक्कलकोट : सोलापूर येथे आयोजित केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात अक्कलकोट येथून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुणांनी सहभाग ...
अक्कलकोट : सोलापूर येथे आयोजित केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात अक्कलकोट येथून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुणांनी सहभाग नोंदवला. पोलिसांनी तालुक्यात आठ ठिकाणी नाकाबंदी करून, वाहनांतून आलेल्या कार्यकर्त्यांना परत पाठवून दिले.
रविवारी सकाळी अक्कलकोट तालुक्यातून जीप, कार, दुचाकी घेऊन तरुण सोलापूरच्या दिशेेने निघाले. तालुक्यातून १२५ वाहनांमधून कार्यकर्ते निघाले. त्यापैकी ७० हून अधिक वाहनांनी सोलापूर गाठले. तितक्याच गाड्या परत पाठविण्यात पोलीस यशस्वी ठरले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगरसेवक महेश हिंडोळे, मीलन कल्याणशेट्टी, प्रदीप पाटील, मोतिराम राठोड, शिवशरण जोजन, प्रदीप जगताप, अतुल जाधव, आप्पासाहेब बिराजदार, बाळा शिंदे, अतुल कोकाटे, वागदरीचे प्रदीप पाटील, राजकुमार झिंगाडे, दशरथ गायकवाड, छोटू पवार, सुनील सावंत, ऋषी लोणारी, नागराज कुंभार, राहुल काळे, दयानंद बमनळ्ळी, चंद्रकांत दसले सहभागी झाले होते.
--------
पोलिसांसह १०७ जणांचा ताफा
या पार्श्वभूमीवर दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह पाच अधिकारी, २५ पोलीस कर्मचारी, १० होमगार्ड, तर उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्यासह ४ अधिकारी, ५० कर्मचारी,१८ होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेऊर, रामपूर, सुलेरजवळगे, करजगी येथून, तर उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलगर रोड, वागदरी, हन्नुर, बायपास रोडवर व सोलापूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ अशा आठ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
--
रस्त्यावरच मारला ठिय्या
अक्कलकोट येथून सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्या पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रोखल्या गेल्या. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टींसह असंख्य कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारून आंदोलन केले. मल्लिकार्जुन नगर सोलापूर येथे सर्वच गाड्या अडविण्यात आल्या.
--
फोटो : ०४ अक्कलकाेट २
अक्कलकोट - सोलापूर मार्गावर पोलिसांनी आंदोलकांना अडविताच आमदार सचिन कल्याणशेट्टींसह सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करताना महेश हिंडोळे, मोतिराम राठोड, शिवशरण जोजन, मीलन कल्याणशेट्टी, अतुल जाधव, अतुल कोकाटे.