रेल्वे कामांना पुरेसा निधी द्या !

By admin | Published: July 11, 2014 01:57 AM2014-07-11T01:57:21+5:302014-07-11T01:57:21+5:30

मोहिते-पाटील यांची रेल्वेमंत्र्यांशी भेट : पुरवणी बजेटमध्ये मागण्या मान्य करण्याचे आश्वासन

Provide adequate funds to the railway work! | रेल्वे कामांना पुरेसा निधी द्या !

रेल्वे कामांना पुरेसा निधी द्या !

Next


अकलूज : पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गासाठी व कुर्डूवाडी येथील वर्कशॉप सुरू करण्यासाठी रेल्वेच्या पुरवणी बजेटमध्ये सहानभुतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी दिले. यासंदर्भात माढ्याचे खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन पंढरपूर-लोणंद मार्गाचे महत्त्व पटवून दिले. पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्ग पूर्ण व्हावा यासाठी जनतेमधूनही जोरदार मागणी होत असल्याचे खा. मोहिते-पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले. त्यासाठी हा रेल्वेमार्ग लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी आपण योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांना दिले आहे. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. धनंजय महाडिक, खा. राजीव सातव उपस्थित होते.
कुर्डूवाडी येथील रेल्वे डबे तयार करण्याच्या वर्कशॉपला मंजुरी मिळूनही त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. याकडे खा. मोहिते-पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. ३०.२५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर आहे. यासाठी लवकर निधी उपलब्ध करून काम सुरू करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
रेल्वेमार्ग पूर्णत्वास अडचण नाही
लोणंद-पंढरपूर रेल्वे मार्ग भारताची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरपर्यंत जाणार असल्याने भाविकांची मोठी सोय होणार आहे. या रेल्वे मार्गाचे लोणंदपासून फलटणपर्यंतचे काम झालेले आहे. फ लटण ते पंढरपूरपर्यंतचे काम प्रलंबित आहे. या रेल्वे मार्गाचा सर्व्हे पूर्ण होऊन जमिनीचे अधिग्रहणही झालेले आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी काहीही अडचण नाही.
------------------------
तत्काळ माहिती मागविणार
लोणंद-पंढरपूर रेल्वे मार्ग व कुर्डूवाडी येथील वर्कशॉपचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यासंदर्भातील माहिती तत्काळ मागवणार आहे़ रेल्वेचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला आहे. यानंतर काही दिवसांतच पुरवणी अर्थसंकल्प केला जातो. यात दोन्ही मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन सदानंद गौडा यांनी दिले.
----------------------------
लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्ग व कुर्डूवाडीतील रेल्वे वर्कशॉप याच्या पूर्णत्वासाठी रेल्वे मंत्र्यांशी आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी यासंदर्भात आपण जातीने लक्ष घालू असे आश्वासन दिलेले आहे. रेल्वेच्या पुरवणी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यासाठी आपला प्रयत्न राहील
- विजयसिंह मोहिते-पाटील
खासदार
 

Web Title: Provide adequate funds to the railway work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.