नॉर्थकोट मैदानात नाट्यप्रेमींसाठी द्या सुविधा; संमेलन पदाधिकाऱ्यांची मागणी
By शीतलकुमार कांबळे | Published: December 13, 2023 03:31 PM2023-12-13T15:31:18+5:302023-12-13T15:31:37+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईतर्फे सोलापुरात होणाऱ्या शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनासाठी नॉर्थकोट प्रशालेत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आली. संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
नॉर्थकोट प्रशाला येथील मैदान २० जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत उपलब्ध करून द्यावे, परिसरातील व अंतर्गत रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, रंगरंगोटी करावी, वाहनतळासाठी नॉर्थकोट प्रशालेमागील मोकळी जागा मिळावी, संमेलनाच्या संपर्क कार्यालयासाठी तंत्रशिक्षण - प्रशिक्षण यांचे कार्यालय मिळावे, बैठकांसाठी ड्रॉइंग हॉल व ड्रॉइंग रूमच्या दोन्ही बाजूंच्या वर्ग खोल्या २० डिसेंबर ते ३० जानेवारी पर्यंत मिळाव्यात अशा अनेक मागण्या या निवेदनातून जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आल्या.
संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना आवश्यक सूचना केल्या. बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे नॉर्थकोट प्रशालेस भेट देऊन पाहणी करणार आहेत, असे संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत झालेल्या चर्चेप्रसंगी संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके, समन्वयक मोहन डांगरे, कृष्णा हिरेमठ, राहुल डांगरे, सृष्टी डांगरे आदी उपस्थित होते.