वडापूर धरणाच्या तांत्रिक मान्यतेसह निधीची तरतूद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:55+5:302021-06-22T04:15:55+5:30
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा नदीवर वडापूर येथे मंजूर झालेल्या नियोजित बॅरेजेसला तांत्रिक मान्यतेसह निधीची तरतूद करावी, ...
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा नदीवर वडापूर येथे मंजूर झालेल्या नियोजित बॅरेजेसला तांत्रिक मान्यतेसह निधीची तरतूद करावी, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर आले असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविणाऱ्या वडापूर बॅरेजेसला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव प्रलंबित आहे. याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले. ही तांत्रिक मान्यता विनाविलंब देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. तांत्रिक मान्यतेनंतर बॅरेजेसचे काम रखडण्याची शक्यता असल्याने कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली.
वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेजेस बांधकाम पूर्ण झाल्यास मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या चार तालुक्यांतील हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविणारा हा प्रकल्प असून, तो तातडीने पूर्ण झाल्यास दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासाला गती मिळू शकते. याकडे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती अप्पाराव कोरे, प्रा. सुभाषचंद्र बिराजदार, नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे सहभागी झाले होते.
---
वडापूर बॅरेजेसमुळे भागणार तहान
सोलापूर शहर, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, मंद्रूप, बेगमपूर यासह अन्य लहान-मोठी शहरे भविष्यात विस्तारण्याची शक्यता आहे. या शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरण, त्यांना आवश्यक असणारा पिण्यासाठी पाणीपुरवठा आदी बाबींची गरज वडापूर बॅरेजेसमुळे भागणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.