सोयाबीन, भुईमुगापाठोपाठ मूग, उडदाला विमा संरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:27 AM2021-09-08T04:27:48+5:302021-09-08T04:27:48+5:30
चपळगाव : यावर्षीच्या खरीप हंगामात असंतुलित पर्जन्यवृष्टी झाल्याने अक्कलकोट तालुक्यातील खरिपाच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे खरिपातील ...
चपळगाव : यावर्षीच्या खरीप हंगामात असंतुलित पर्जन्यवृष्टी झाल्याने अक्कलकोट तालुक्यातील खरिपाच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, तूर यांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना सोयाबीन व भुईमुगाच्या नुकसानीपोटी २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र असंतुलित पर्जन्यवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील उडीद व मुगाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मूग, उडीद उत्पादकांना पीक विम्यापोटी नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
खरिपातील पिकांवर शेतकऱ्याचे संपूर्ण वर्षाचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र यावर्षी पाऊस वेळेवर पडला नाही. पेरणीनंतर पाऊस गायब झाला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. मात्र ऐन फुलोऱ्यात व फळधारणेच्या वेळी पावसात मोठा खंड पडला. यामुळे उत्पादन घटले. अक्कलकोट तालुक्यात यावर्षी २०,००० हेक्टरवर उडीद, तर ३५०० हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. कमी वेळेत जास्त फायदा देणारी पिके असल्याने मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली.
सद्यस्थितीत असेल ते पीक रास करून पदरात पाडण्यासाठी शेतकरी तयारीत असताना गेल्या दहा दिवसांपासून पाऊस पडत असल्याने उभ्या पिकांना कोंब फुटत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच उडीद, मूग काढून ज्वारीसाठी शेत तयार करण्यासाठी शेतकरी नियोजन करत असले तरी वारंवारच्या पावसाने घडी विस्कटणार आहे.
सरासरीच्या जादा पाऊस
ज्यावेळी पाऊस पाहिजे त्यावेळी पडला नाही अन् ज्यावेळी पाऊस नको, त्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला. चपळगाव मंडलात जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात असमान पर्जन्यवृष्टी होत सरासरीच्या १४९.६ टक्के पाऊस पडला आहे, तर सप्टेंबरमध्ये सोमवारपर्यंत सरासरीच्या २१०.३ टक्के तर पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत १५५.६ टक्के पाऊस झाला आहे.
----
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मूग व उडदाची पेरणी झाली आहे. मध्यंतरी पावसात खंड पडल्याने पिकांवर तण आले आहे. यामुळे उत्पादन घटणार आहे. कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आदी कर्मचारी पीक कापणी प्रयोग घेत आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे नुकसान झाले आहे. याबाबत वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार आहे.
- सूर्यकांत वडखेलकर
तालुका कृषी अधिकारी
060921\0310img-20210831-wa0025.jpg
पीक कापणी प्रयोग करताना तालूका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर व अन्य कर्मचारी...