शालेय पोषण आहार अनुदान द्या, अन्यथा आंदोलन, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:35 PM2017-12-27T12:35:45+5:302017-12-27T12:37:28+5:30
जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठीचे लागणारे इंधन - भाजीपाला अनुदान देण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग टाळाटाळ करीत आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठीचे लागणारे इंधन - भाजीपाला अनुदान देण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग टाळाटाळ करीत आहे. या विरोधात प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
समन्वय समितीच्या नेत्यांनी नुकतेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले. यावेळी शिवानंद भरले, मच्छिंद्रनाथ मोरे, अनिल कादे, इक्बाल नदाफ, अरूण नागणे, सुधीर कांबळे, दिनेश क्षीरसागर, नवनाथ धांडोरे, विद्याधर भालशंकर,रहिम शेख, दावल नदाफ, सूर्यकांत हत्तुरे- डोगे आदी उपस्थित होते. भरले म्हणाले की, प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठी लागणारे इंधन-भाजीपाला अनुदान राज्य शासनाकडून जूनमध्ये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. मात्र ते अनुदान शाळांना दिले नाही. शिक्षण विभाग झीरो पेंडन्सी मोहीम कागदावरच राबवून शासनाला बोगस अहवाल देत आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतीच कामे वेळेवर होत नाहीत. शालेय पोषण आहार अनुदान मिळण्यासाठी यापूर्वी पाच वेळा प्रशासनाला समन्वय समितीच्या वतीने निवेदने दिलेली आहेत़ त्याचा काहीच विचार झालेला नाही.
--------------
मुख्याध्यापकांची उधारी वाढली
मुख्याध्यापक उधारीने इंधन व भाजीपाला खरेदी करतात. ही उधारी वाढली आहे. त्यामुळे अनेक मुख्याध्यापकांना उधारीने हे साहित्य दिले जात नसल्याचा आरोपही शिक्षण समितीने केला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अनुदान वाटप करावे अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.