माघी यात्रेतील भाविकांच्या सुरक्षेसाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त; सोलापूर ग्रामीण पोलिसांची यंत्रणा सज्ज
By Appasaheb.patil | Published: January 29, 2023 06:54 PM2023-01-29T18:54:25+5:302023-01-29T18:55:29+5:30
एक एसआरपीएफ तुकडी तैनात करणार
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: माघ शुद्ध एकादशी १ फेब्रुवारी २०२३ रोजी असून, या माघी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
माघी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी १ हजार ५५० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये २ पोलीस उपअधिक्षक, २१ पोलीस निरिक्षिक, ६९ सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, ७१३ पोलीस कर्मचारी व ७०० होमगार्ड तसेच १ एसआरपीएफ कंपनीच्या तुकडी तर एक शिघ्र कृती दल पथक नियुक्त करण्यात आले आहेत.
वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, ६५ एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रासह नव्याने नगर प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी सांगितले.
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे. तसेच वाहतुक नियमनासाठी १२ ठिकाणी डायव्हरशन पॉईट करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात तसेच शहराबाहेर १२ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असल्याचेही श्री.कदम यांनी सांगितले. भाविकांनी तसेच नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी नागरिकांनी व भाविकांनी पोलीस प्रशासनास सहाकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"